१० हजाराची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी मुलाच्या हजेरीत सवलत मिळावी, यासाठी महिलेकडून १० हजाराची लाच घेणार्‍या तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश दत्तू बोराटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.१५) रंगेहात पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

तक्रारदाराच्या मुलावर तालुका पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्याची पोलिस ठाण्यात हजेरी लावली गेली. त्याच्या हजेरी व तपास प्रक्रियेत मदत करण्याच्या बदल्यात १० हजार रुपयांची मागणी अंकुश बोराटे याने केली होती. याची तक्रार महिलेने लाचलुचपत प्रतबंधक विभागाकडे केली. पथकाने पंचासमक्ष याची पडताळणी करुन पोलीस ठाण्यात सापळा रचला. बोराटे याला प्रत्यक्ष पैसे स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपतच्या पोलिस निरीक्षक मृदूला नाईक यांच्या पथकाने केली.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधावा.