पोलिस सह आयुक्त शिवाजी बोडखे यांचा सत्कार

अहमदनगर : पोलीसनामा आॅनलाइन – स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्यावतीने राज्यपालांच्या हस्ते वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल सन्मानित करण्यात आलेले व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पुणे येथील पोलिस सह आयुक्त शिवाजी तुकाराम बोडखे यांचा सत्कार करण्यात आला. बोडखे हे श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुद्रीक या गावातील रहिवासी आहेत. १९८४ मध्ये स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची पोलिस उपअधीक्षक पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती झाली.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चंद्रपूर त्यानंतर लातूर येथे अवैध व्यवसाय व गुंडगिरीस आळा घातला. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांनी नागरिकांकडून आपुलकी व विश्वास संपादन केला. पुढे त्यांना मुंबई येथे उपायुक्त म्हणून बढती मिळाली. नंतर यवतमाळमध्ये पोलिस अधीक्षक, विधानभवनात सुरक्षा अधिकारी, ठाणे येथे अतिरिक्त पोलिस आयुक्त, नागपूर येथे पोलिस महानिरीक्षक, गडचिरोली येथे नक्षल विरोधी अभियान राबवून नक्षलींचा बिमोड केला. ते सध्या पुणे येथे पोलिस सह आयुक्त पदावर कार्यरत आहेत.

२००१ मध्ये गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पुरस्कार, २०१८ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण सेवेबद्दल राज्याचे राज्यपाल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यांच्या या चांगल्या सेवेबद्दल स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांच्या हस्ते बोडखे यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे २७ ला मुंबईत आंदोलन
धुळे : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या मान्य करुन त्यांना न्याय मिळावा. यासाठी राज्य जिल्हा परिषद लिपीकवर्गीय कर्मचारी संघटनेतर्फे मुंबई येथे २७ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन दिले आहे.

याप्रसंगी वनराज पाटील, एकनाथ चव्हाण, मुकुंदा पगारे, दिनेश महाले, किशोर पगारे, पोपटराव सूर्यवंशी, विजय गिरासे, लक्ष्मण कुलकर्णी, किशोर पाटील, अनिलकुमार सोनवणे, विजय पाटील, शिवाजी भामरे उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत १४ वेळा बैठक झाली आहे. प्रत्येकवेळी प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन देता येते, पण प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे दि. २७ नोव्हेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यात लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड-पे वेतनात सुधारणा करुन त्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, डीसीपीएस सेवानिवृत्ती योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करावी, लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांचे अन्यायकारक बदली धोरण रद्द करावे, कर्मचाऱ्यांचा जॉब चार्ट निश्चित करावा, सहायक प्रशासन अधिकारीपदाला द्वितीय श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, केंद्रीय लिपीकाप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेत बदल करावा, लिपिकांची रिक्त पदे तातडीने भरावी, या मागण्या करण्यात येणार आहेत.