खाकी वर्दीतल्या आईला सलाम ; अनाथ मुलीला केलं स्तनपान

हैद्राबाद : वृत्तसंस्था – पोलीस सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात. पण पोलीस म्हटलं की आपल्यासमोर त्यांची शिस्तच प्रथम येते पण या खाकी वर्दीच्या मागे देखील माणुसकी दडलेली असते, याचा प्रत्यय नुकताच हैद्राबाद येथील घटनेतून आला. हैद्राबाद येथील बेगमपट पोलिस ठाण्यात काम करीत असलेल्या के. प्रियांका यांनी भुकेने व्याकुळ झालेल्या अनाथ मुलीला स्तनपान केले. खाकी वर्दीतल्या या आईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
पोलीस दाम्पत्य सन्मानित
के. प्रियांका या महिला पोलीस कर्मचाऱ्याला त्यांचा पती आणि अफजलगंज पोलीस स्थानकात कॉन्स्टेबलप्रियांका असलेल्या एम रविंदर यांनी फोन करून एक लहान मुलगी रडत असल्याचं कळवलं. त्यानंतर प्रसुती रजेवर असणाऱ्या के. प्रियांका या त्या मुलीकडे गेल्या. त्या व्याकूळ झालेल्या चिमुकलीला पाहून के. प्रियांका यांच्यातील आईला राहावलं नाही. त्यानंतर प्रियांका यांनी त्या मुलीला मायेनं जवळ घेत तिला आपलं दूध पाजलं आणि तिला रुग्णालयात नेलं.
प्रियांका आणि त्यांच्या पतीनं एका अनाथ मुलीसाठी दाखवलेल्या संवेदनशीलतेबाबत माहिती मिळाल्यानंतर हैद्राबादच्या पोलीस आयुक्तांनी या पोलीस दाम्पत्याला सन्मानित केलं. तसंच आता चहुबाजूंनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, ही लहान मुलगी नक्की कुणाची आहे याबाबत खुलासा झाला. सफाई कर्मचारी असणारी माहिला आपल्या लहान मुलीला घेऊन रुग्णालयात गेली होती. तिनं काहीतरी कारण सांगून मुलीली रुग्णालयात असणाऱ्या मोहम्मद इरफान या व्यक्तीकडे सोपवलं. पण नंतर ती महिला मुलीला घेण्यासाठी परत आलीच नाही. त्यानंतर मोहम्मद इरफान या इसमानं मुलीला अफजलगंज पोलीस स्थानकात आणून सोडलं. जिथं के. प्रियांका यांचे पती कार्यरत होते.पोलिसांनी या मुलीच्या आईचा शोध घेतला आहे. मी जिथं माझ्या मुलीला सोडलं ती जागा नंतर मी विसरले, त्यामुळे तिला घेण्यासाठी तिथं परत जाऊ शकले नाही, असं सफाई कर्मचारी असणाऱ्या या मुलीच्या आईचं म्हणणं आहे.