पोलिसांमुळे मिळाले ज्येष्ठ नागरिकाला हक्काचे घर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील जुन्या झालेल्या गृहरचना संस्थेच्या इमारती पुर्नविकासाचे काम सोसायट्या घेऊ लागल्या आहेत. परंतु काहीवेळा बांधकाम व्यवसायिकाकडून या इमारतीचा ताब्या घेतल्यानंतर मुळ घरमालकाला घर परत करण्यास टाळाटाळ केली जाते. अनेकवेळा धमकावण्याचा प्रयत्न केला जातो. कराराप्रमाणे बिल्डर वागत नाहीत आणि घरमालकाला नाहक त्रास सहन करावा लागतो. मग पोलीस ठाण्याची पायरी चढण्याशिवाय त्याच्यासमोर कोणताच पर्याय नसतो. पोलीस ठाण्यात गेल्यानंतर या ठिकाणचे पोलीस कर्मचारी टाळाटाळ करुन काहीतरी समेट करुन घ्या, मिटवून घ्या, कोर्टात जावा असे फुकटचे सल्ले घरमालकाला देतात. मात्र, याला अपवाद दत्तवाडी पोलीस. दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. दत्तवाडी पोलिसांचा आदर्श इतर पोलिसांनी घ्यावा जेणे करुन अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकेल.

रविकुमार सदाशिव भावे (वय ६७, रा़ बल्लाळ सोसायटी, पद्मावती, सहकारनगर) हे राहत असलेल्या सहकारी गृह संस्थेच्या पुर्नविकासाचा हक्क एका बांधकाम व्यावसायिकाला दिला होता. त्यांचा करार २०१४ मध्ये होऊन आॅक्टोंबर २०१७ ला रवीकुमार यांना सदनिका देणे अपेक्षित होते. पण, त्यांनी वर्ष उलटल्यानंतरही ताबा दिला नाही. भावे यांनी महाराष्ट्र सरकारच्या आपलं सरकार या पोर्टलवर तक्रार नोंदविली. ही तक्रार दत्तवाडी पोलिसांना १८ नोव्हेंबर २०१८ ला मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक शंकर सलगर यांना तक्रारदारांना मदत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोघा संबंधितांना समोरासमोर बसवून समेट घडवून आणला.

बांधकाम व्यावसायिकाने दोन आठवड्यात भावे यांच्या सदनिकेची रंगरंगोटी आणि राहिलेली इतर छोटी मोठी कामे करुन दिली व भावे यांना सदनिकेचा ताबा दिला. बांधकाम व्यावसायिकांनी अंतर्गत सोयी सुविधा देण्याचे कबुल केल्यामुळे भावे यांनी सर्वात प्रथम ७ लाख रुपये देण्याचे ठरले होते. पंरतु भावे यांच्याकडून ९ लाख रुपये घेतले. तरीसुद्धा त्यांना ताबा मिळाला नव्हता. बांधकाम पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिना १६ हजार ५०० रुपये भाडे भावे यांना द्यायचे कबूल करुनसुद्धा एप्रिल २०१६ पासून ती रक्कम देण्यात आली नाही. ती रक्कम तडजोडीमध्ये बांधकाम व्यावसायिक यांनी एकूण सव्वा लाख रुपये व पाच हजार रुपये  वाहतूकीचे भाडे म्हणून दिले आहे.