पोलिस कर्मचार्‍याला लाच घेण्यास केले प्रोत्साहित : वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोत्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन-वाईन शॉपमधून दारूच्या बाटल्यांची खरेदी करून घेवुन जाणार्‍यावर कारवाई न करण्यासाठी पोलिस कर्मचार्‍याला 20 हजार रूपयाची लाच घेण्यास सांगुन त्यास प्रोत्साहित करणार्‍या पोलिस निरीक्षकाविरूध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. पोलिस नाईक आणि पोलिस निरीक्षकाविरूध्द अहमदनगरच्या एसीबीने गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचार्‍याविरूध्द लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस निरीक्षक अविनाश शंकरराव शिळीमकर (52, रा. राहुरी, जि. अहमदनगर) आणि पोलिस नाईक गुलाब उत्‍तम मोरे (32, रा. राहुरी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीच्या पथकाने पोलिस नाईक गुलाब मोरे यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी 45 वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदविली आहे. दि. 14 ऑक्टोबर रोजी पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनी पोलिस कर्मचारी मोरे यांच्याकरवी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार हे राहुरी येथील आय.एम. मोटवाणी वाईन शॉपचे व्यवस्थापक आहेत.

दि. 14 ऑक्टोबर रोजी योगेश तुवर यांनी वॉईन शॉपमधून दारूच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. त्या बाटल्या घेवुन जात असताना त्यांना राहुरी पोलिसांनी पकडले होते. तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी पोलिस निरीक्षक शिळीमकर यांनी पोलिस कर्मचारी मोरे यांच्या करवी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करायला लावुन पोलिस कर्मचारी मोरे यांना लाचेची रक्‍कम स्विकारण्याकामी प्रोत्साहित केले. त्यामुळे पोलिस निरीक्षक शिळीमकर आणि पोलिस नाईक गुलाब मोरे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

एसीबीच्या पथकाने पोलिस कर्मचारी गुलाब मोरे यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस उपाधिक्षक शंकर कांबळे यांनी सापळा अधिकारी म्हणुन काम पाहिले आहे. पोलिस निरीक्षकासह एका पोलिस कर्मचार्‍याच्या विरूध्द 20 हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.