‘त्या’ लाचखोर पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याचे तडकाफडकी निलंबन

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – सदोष दोषारोपपत्र व गुन्ह्याची तीव्रता कमी करण्यासाठी पाच लाख रुपये लाच स्वीकारल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुनील बोटरे व लाचेची मागणी करणारे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलीस निरीक्षक कुलकर्णी याच्या निवासस्थानाची झडती घेतली. यामध्ये पाच लाख ९० हजार रुपये जप्त करण्यात आले. दोघांनाही जिल्हा न्यायालयात हजर करून चार दिवस पीसीआर मिळविला. दरम्यान, दोन पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस नायकाचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले.

कळंब येथील जीनिंगमध्ये धाड टाकून बियाणे व कीटकनाशकाचा साठा जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. दरम्यान रविवारी मुकुंद कुळकर्णी, सुनील बोटरे यांना जिल्हा न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी व बचाव पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर न्या.अकाली यांनी मुकुंद कुलकर्णी,सुनील बोटरे यांना १० जानेवारीपर्यंत चार दिवस पीसीआरमध्ये ठेवण्याचे आदेश दिले. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलीस निरीक्षक कुळकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस नायक बोटरे यांना निलंबित करण्यात आले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात असलेले एलसीबीचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी हे मूळचे उस्मानाबाद येथील रहिवासी आहेत. यवतमाळ येथील कुलकर्णी यांच्या घरातून पाच लाख ९० हजार रुपये आढळले. त्यामुळे कुलकर्णीच्या उस्मानाबाद येथील संपत्तीवरही चौकशीची टाच आली आहे. लाचलुचपत विभागाचे अमरावती येथील पोलीस उपअधीक्षक गजानन पडघन यांनी उस्मानाबाद येथील कार्यालयाला उस्मानाबाद येथील कुळकर्णीच्या घरी धाड टाकण्याचे अधिकारपत्र दिले आहे. त्यावरून कुलकर्णी याच्या उस्मानाबाद येथील संपत्तीच्या चौकशीला प्रारंभ झाल्याची माहिती सूत्राने दिली.