वरिष्ठ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी निलंबित केले आहे. कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत डान्स बारवर एका पाठोपाठ तीन कारवाया करण्यात आल्या. असे डान्स बार सुरु असताना त्याची कोणतीही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नव्हती. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्यासह सर्व पोलीस निरीक्षकांना आपल्या हद्दीत डान्स बार सुरु असता कामा नये, अशा लेखी सूचना पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिल्या होत्या. तसेच रात्री उशिरापर्यंत कोणतेही बार चालू राहणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले होते. असे असताना कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात सर्वप्रथम नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्तांच्या आदेशाने एका डान्स बारवर कारवाई करण्यात आली. त्यापाठोपाठ काही दिवसांनी गुन्हे शाखेने आणखी एका डान्स बारवर कारवाई करुन तेथून काही तरुणींना ताब्यात घेतले.

पोलिसांसमोर बिबट्याची परेड…

१३ नोव्हेंबर रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे यांची नाईट राऊंड होती. त्यांनी आपल्या हद्दीत कोणताही डान्स बार सुरु नाही, तसेच रात्री उशिरापर्यंत बार चालू नसल्याची खात्री करणे आवश्यक होते. असे असतानाही पोलीस आयुक्तांना मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोलीतील कॅप्टन बार चालू असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा घातला. तेव्हा तेथे डान्स बार सुरु असल्याचे व तेथे २३ तरुणी आढळून आल्या होत्या. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नाईट राऊंड असताना त्यांच्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्या युनिटने येऊन डान्स बारवर कारवाई केली. एका पाठोपाठ तीन कारवाया झाल्याने शेवटी पोलीस आयुक्त संजयकुमार यांनी खाडे यांना निलंबित केले.