अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या पोलीसाला केले निलंबित

जळगाव : पोलीसनामा आॅनलाइन – अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी विनोद अहिरे यास पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, अहिरे यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनाविली आहे. बस स्टँण्डजवळील स्केटींग क्लब येथील कराटे प्रशिक्षक तथा पोलीस कर्मचारी विनोद अहिरे याने येथे कराटे प्रशिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बार्शी शहरात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा खून 

पीडित अल्पवयीन जळगाव तालुक्यातील रहिवासी असून जळगाव येथे मावशीकडे राहते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या या तरुणीने एप्रिल २०१८ मध्ये भावाला सोबत घेऊन पोलीस स्केटींग क्लब येथे कराटे प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. कराटे प्रशिक्षक तथा पोलीस कर्मचारी विनोद अहिरे याने पीडित तरुणीशी जवळीक साधत तिच्यावर त्याच्या घरात अत्याचार केला. यानंतर पीडित व तिच्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याने विविध हॉटेलवर पीडित मुलीला घेऊन जात वेळोवेळी अत्याचार केला.

हा अत्याचार असह्य झाल्याने पीडित मुलीने पालकांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरुन विनोद अहिरे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करत त्यास जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती चित्रा हंकारे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ॲड. केतन ढाके यांनी काम पाहिले. दरम्यान याप्रकरणी पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी विनोद अहिरे यास निलंबित केले आहे.