पुण्यातील पोलीस अधिकाऱ्याची करमाळ्यात गुंडगिरी ?

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – करमाळा तालुक्यात पाण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी समोर आली. एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोबत तलवारी घेतलेल्या गुंडाच्या मदतीने करमाळ्यातील सावडी ग्रामस्थांना दमबाजी करतानाच्या व्हिडीओमुळे एकच खळबळ उडाली आहे. दत्तात्रय मदने असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असून ते पुण्यातील कात्रज पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या संबधीत व्हिडीओ हा आपल्या शेतातील नसल्याचे सांगून ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी मी त्याठिकाणी उपस्थित नसल्याचे दत्तत्रय मदने यांनी पोलीसनामाशी बोलताना सांगितले.

सावडी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या करमाळा तालुक्यात दुष्काळ असल्याने कुकडी नदीचे पाणी ओढ्यातून विहिरीत साठवून घेण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करीत होते. पुणे जिल्ह्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने याच गावात शेतजमीन खरेदी केली आहे. शेततळ्यात पाणी नेण्यासाठी या पोलीस अधिकाऱ्याने गावाकडे जाणारे पाणी वाळवून आपल्या शेताकडे नेण्यास सुरुवात केली. मात्र पाणी वळवण्यास ग्रामस्थांनी विरोध केला.

ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यासोबत तलवारी घेऊन असणाऱ्या गुंडानी ग्रामस्थांना धमकावण्यास सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांना जिवंत मारण्याच्या धमक्याही या गुंडांनी दिल्या. उपस्थित पोलीस अधिकारी त्यांना चिथावणी देत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आज ग्रामस्थांनी सोलापूर पोलीस अधीक्षकांकडे पोलीस अधिकारी दत्तात्रय मदनेची यांची तक्रार केली.

याप्रकरणात दत्तात्रय मदने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, करमाळा तालुक्यात आमचे घर आणि शेती आहे. दिवाळी सणानिमीत्ता गावी आल्यानंतर ओढ्यातील पाणी शेतातील शेततळ्यात सोडण्यात आले होते. पाण्यासाठी रितसर परवानगी घेतली असून त्याचे पैसे देखील भरण्यात आले आहेत.  पाणी घेत असताना काही ग्रामस्थांनी या ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मी घटनास्थळी नसल्याने मला याची कल्पना देण्यात आली. माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधून शेततळ्यात जाणारे पाणी बंद केले. तसेच या ठिकाणी आलेल्या गावकऱ्यांची समजूत घातली. सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा माझ्या शेतातील नसून तो दुसरीकडचा आहे. तसेच हा व्हिडीओ तीन ते चार व्हिडीओ एकत्रीत करुन तयार करण्यात आला असून आपली यामुळे बदनामी होत असल्याचेही मदने यांनी सांगितले.