अन पोलिसांनीच घराचे कुलूप तोडून लाखोंचे साहित्य पळवले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर शहरात घडलेल्या एका घटनेत शहरात राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या घरातील घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, विदेशी चलन, लॅपटॉप तसेच अत्यंत महत्वाचे शैक्षणिक कागदपत्रे चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. बजाजनगरच्या पोलिसांनी हे कृत्य केले असल्याचा आरोप या  दाम्पत्याने केला आहे.

याबाबत पोलीस प्रशासनाला विचारले असता त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केल्याचे समजते आहे. आम्ही जेएनयूचे विद्यार्थी असल्याने, आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोपही दाम्पत्याने केला आहे.’
जेएनयूचे विद्यार्थी असल्याने त्रास : दाम्पत्य 
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की , डॉ. शिवशंकर दास आणि डॉ. क्षिप्रा उके हे दाम्पत्य जेएनयू विद्यापीठातील पीएडी धारक आहेत. ते नागपूरात बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लक्ष्मीनगर भागात जगदीश लांबे यांच्याकडे २०१५ पासून भाड्याने राहतात. २०१५ मध्ये त्यांनी ११ महिन्यांचा करार केला होता. पुढे करारात वाढ करण्यास घरमालकाने नकार दिला. मात्र, दुसरे घर मिळेपर्यंत १० टक्के भाडेवाढ करुन तेथेच राहण्यास सहमती दिली.
नोटीस न देता पोलिसांची कारवाई 
दरम्यान, घरमालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर घरमालकाच्या मुलगा तुषार लांबे यांने दाम्पत्याला मागासवर्गीय असल्याचे सांगत त्रास देण्यास सुरूवात करुन घर खाली करण्यासाठी न्यायालयामार्फत नोटीस बजावली. हे प्रकरण न्यायालयात आहे. दरम्यान, ८ सप्टेंबर २०१८ ला हे दांम्पत्य दिल्लीला गेले होते. तेव्हा घरमालक तुषार लांबेसह बजाजनगरचे तीन पोलिसांनी कोणतीही नोटीस न देता घरी येऊन कुलूप तोडले.
घरातील सर्व सामान गच्चीवर फेकून विदेशी चलन, सोन्याचे दागिन्यांसह लाखोंचे साहित्य, तसेच शैक्षणिक कागदपत्रे आणि रिसर्चचे अहवालही चोरुन नेले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर हा सर्व प्रकार कळाला असे दाम्पत्यचे म्हणणे आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना घर मालकाच्या मदतीने पोलिसांनी हा सगळा प्रकार केला. या प्रकरणाची तक्रार करुनही पोलीस दोषीवर कारवाई करायला टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप दाम्पत्यांनी केला आहे.