थर्टी फस्टची पार्टी बंद करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलिसांवर हल्ला करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस सुरु आहे. आंबोली येथे हेल्मेट न घालणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करत असताना पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली. तर उल्हासनगरमध्ये पहाटेपर्य़ंत चालणारी थर्टी फस्टची पार्टीतील साऊंड सिस्टीम बंद केल्याच्या करणावरुन पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण करुन एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

कॅम्प नं.-३, महापालिका टाउन हॉलमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरला पार्टी ठेवली होती. मोठ्या आवाजात गाणी लावून झिंगाट झालेले नृत्य करत होते. पहाटे ४ वाजताच्यादरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे यांनी पथकासह तेथे जाऊन स्पीकर बंद केला आणि टाउन हॉलच्या व्यवस्थापकाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले. त्यावेळी पार्टीतील काही जण पोलीस ठाण्यात आले. याबाबत चौकशी सुरू असताना मनीष सोनावणे याने मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरू करुन, आम्हाला सकाळी ५ वाजेपर्यंत परवानगी असल्याचे सांगितले.

मनीष याला चित्रीकरण करण्यास पोलिसांनी मनाई केली. तसेच मादक पदार्थाची तपासणी करण्यासाठी सोनावणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याने उपनिरीक्षक दाभाडे यांची कॉलर पकडून मारहाण केली. या मारहाणीत दाभाडे यांच्या शर्टाची दोन बटणे तुटली. यावेळी दुसरा आरोपी महेश कोरडले यांनी दाभाडे यांना धरून ठेवले होते.

अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेले पोलीस शिपाई वंजारी यांच्या हाताच्या अंगठ्याला सोनावणे याने चावा घेऊन शिवीगाळ केली. तसेच सूचना फलकावर स्वत:चे डोके आपटून इजा करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मनीष, महेश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.