आयुक्तालयातील ‘त्या’ ७९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीपुर्वी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. त्यानुसार औरंगाबाद पोलीस आयुक्तालयातील एकूण ७९ पोलीस अधिकारी बदल्यांच्या प्रतिक्षेत आहेत. त्यात १२ पोलीस निरीक्षक आणि ६७ सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

हे ही वाचा – राज्यातील 43 पोलिस उप अधीक्षक /सहाय्यक आयुक्‍तांच्या बदल्या

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकाच जिल्ह्यात कार्यकारी पदावर तीन वर्षे अथवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याच्या बदल्या कऱण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या निवडणुकीपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. यावेळी बदल्यांचे अधिकार पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रथमच बदलीपात्र ठरविण्यात आले आहे.

हे ही वाचा – 5 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

सलग तीन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळापासून पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या १२ पोलीस निरीक्षक बदलीस पात्र आहेत. त्यासोबतच २०१४ साली निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचीदेखील बदली करण्यात येणार आहे. अकार्यकारी शाखेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. त्यानुसार ७९ अधिकाऱ्यांची यादी मुंबईला पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आली आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली.