पोलिस अधिकाऱ्याचा भाचा अडकला दारूच्या तस्करीत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – गोव्यातील दारूची राज्यात तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने नगर-पुणे रस्त्यावर पकडले. त्यांच्याकडून विदेशी दारू, कार, मोबाईल हँडसेट असा सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील एक आरोपी पोलिस अधिकाऱ्याचा भाचा आहे.
याप्रकरणी अमोल दत्तात्रय पांढरकर (वय ३०, रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा), संदीप सुभाष रायकर (वय २९, रा. हंगेवाडी, ता. श्रीगोंदा) या दोघांविरुद्ध सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. गोव्यातील दारू चोरून राज्यात विक्रीसाठी आणली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. शुक्रवारी शिरूर येथून नगरला एका कारमधून दारूचा साठा येणार असल्याचे खबऱ्याकडून समजले होते. त्यावरून पोलिस उपनिरीक्षक सचिन खामगळ, कर्मचारी दत्तात्रय गव्हाणे, मन्सूर सय्यद, रवींद्र कर्डिले, संतोष लोंढे, विजय ठोंबरे, सचिन आडबल, रवी सोनटक्के, संभाजी कोतकर आदींच्या पथकाने शिरूर-नगर रस्त्यावर सापळा रचला.
सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक संशयित स्विफ्ट पोलिसांच्या नजरेत पडली. पोलिसांनी सदर कार पकडून झडती घेतली असता आतमध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला. त्यांच्याकडे दारू वाहतुकीचा परवाना नव्हता. सदरची दारू महाराष्ट्रात विक्री करण्यासाठी परवानगी नव्हती. ती दारू गोवा राज्यातील होती. गोव्यातील दारू महाराष्ट्रात चोरट्या मार्गाने आणून ती विक्री करणारे मोठे रॅकेट कार्यरत असावे, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी कारमधील दोघांना पकडून त्यांच्याकडून ३८ हजार ९२८ रुपयांची दारू, मोबाईल हॅण्डसेट, कार असा एकूण ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना पुढील चौकशीसाठी सुपा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, अटकेची कार्यवाही करण्यात आली आहे.