महिला डॉक्टरचे १६ तोळे सोने पोलिसांनी दिले ३ तासात परत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – विखे पाटील फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरची 16 तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स गायब झाली होती. एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या तीन तासांच्या आत शोध घेऊन ती पर्स सदर डॉक्टरला परत केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, विखे पाटील मेडिकल हॉस्पिटलमधील डॉ. स्नेहा मुरादे यांची 16 तोळे सोने असलेली बॅग हॉस्पिटलमध्ये विसरली होती. ती बॅग कुठे गेली, याचा पत्ता लागत नसल्याने शनिवारी दुपारी सदर महिला डॉक्टरने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी पोलिसांना पर्समध्ये 16 तोळ्याचे सोन्याचे दागिने असल्याचे सांगितले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश मोरे, पोलीस कर्मचारी महेश दाताळ, परशुराम नाकाडे, गायत्री धनवडे आदींनी विखे पाटील हॉस्पिटल येथे धाव घेऊन दागिन्यांची शोधाशोध सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेच्या सदरची पर्स हाती लागल्याचे लक्षात आले.

पर्स घेऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीही हॉस्पिटल येथे आली होती. काही कर्मचाऱ्यांसोबत बोलत असल्याचे लक्षात आले. संबंधित कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असता त्यांनी इथे कुणाची पर्स विसरली आहे का, अशी विचारणा सदर महिलेने केल्याचे सांगितले. त्यामुळे सदर महिलेचा हेतू हा चोरीचा नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी हॉस्पिटलमधील त्या वेळेचे केसपेपर तपासले. झेंडीगेट परिसरातील एका लग्नाची माहिती मिळाली. सदर रुग्ण एका महिलेसोबत आला होता.

पोलिसांनी झेंडीगेट येथे जाऊन सदर महिलेचा शोध घेतला. त्यावेळी तिने ‘पर्स मला मिळाली आहे. त्याबाबत मी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडे विचारपूस केली. पण कोणीही काही बोलले नाही. त्यामुळे मी निघून आले. पुन्हा दुसर्‍या दिवशी जाऊन विचारणा केली. मात्र कुणीही बोलले नाही. म्हणून मी परत आले’, असे तिने पोलिसांना सांगितले. मला सदर बॅग पर्स परत करायची होती, असे सांगितले. तिच्याकडील पर्स पोलिसांनी ताब्यात घेतली. ती पर्स डॉक्टर स्नेहा मुरादे यांना परत देण्यात आली. तब्बल सोळा तोळे दागिने परत मिळाल्यामुळे महिला डॉक्टरने पोलिस प्रशासनाचे आभार मानले. अवघ्या तीन तासात सोन्याच्या दागिन्यांची पर्स सदर महिला डॉक्टरला पोलिसांनी परत मिळवून दिली.