पोलिसांनी लोकांच्या मनात घर करावे : मुख्यमंत्री 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले आहे. त्याची चावी मी पोलिस आयुक्त आर के पद्मनाभन यांच्याकडे स्वाधीन केली आहे. मात्र या चावीने पोलिस आयुक्तांनी लोकांच्या मनात घर करावे, नागरिकामध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करावा अशी अपेक्षा औपचारिक उदघाटन भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवारी) व्यक्त केली.

चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यालय आहे. प्रवेशद्वारावरील फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून उदघाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे, पालकमंत्री गिरीश बापट, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चौबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी औपचारिक उदघाटन झाल्यानंतर आयुक्तालयाची पाहणी केली. पोलीस आयुक्तालयातील विविध शाखा, नियंत्रण कक्षाच्या पाहणीनंतर आयुक्त दालनात चर्चा झाली. यावेळी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी आयुक्तालयाच्या कार्यान्वयासाठी येणा-या अडचणी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी पालकमंत्री, आमदार, महापौर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. आयुक्तालयासाठी 4 हजार 600 पदे मंजूर झाली आहेत. मात्र सध्या केवळ २ हजार कर्मचारी आणि अधिकारी उपलब्ध आहेत. चाळीस लाखांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या शहराच्या सुरक्षेसाठी केवळ दोन हजार पोलीस काम करत आहेत. 223 चारचाकी आणि 143 दुचाकी अशी एकूण 366 वाहनांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत केवळ 52 वाहनांवर आयुक्तालय धावत आहे.

सध्या आयुक्तालयाच्या मुख्यालयासाठी स्वतंत्र इमारत मिळाली असली तरी ती भाडेतत्वावर वापरण्यासाठी मिळाली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी 100 एकर जमिनीची आवश्यकता आहे. त्यामुळे पोलीस मुख्यालय, परेड ग्राउंड, उजळणीवर्ग, खेळाची मैदाने, शस्त्रागार, यासोबतच बॉम्ब शोधक नाशक पथक, श्वान पथक, गंगा काबू पथक, राखीव पोलीस दल यांसारखे विभाग सुरु करता येणार आहेत.

चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे पोलीस ठाण्याचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यांनतर त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी लागणार आहेत. काही पोलीस ठाण्यांच्या भौगोलिक सीमा बदलाची अभ्यास प्रक्रिया सुरु आहे. जानेवारी अखेरपर्यंत ही अभ्यास प्रक्रिया संपणार असून त्याबाबतही प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.