अजित पवार यांच्या दारात पोलिस उभे, कोणत्याही क्षणी अटक

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सिंचन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दारात पोलिस उभे असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होवु शकते असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ते भारतीय जनता पार्टीने (पिंपरी-चिंचवड जिल्हा) आयोजित केलेल्या ‘अटल संकल्प महासंमेलनात’ निगडी येथे बोलत होते.

मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघातील हजारो कार्यकर्ते या अटल संकल्प महासंमेलनास उपस्थित होते. सिंचन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन वेळेस चौकशी झाल्याचे यापुर्वीच उघड झालेले आहे. ऑक्टोबर 2015 आणि मार्च 2018 मध्ये पवार यांचे स्टेटमेंट घेण्यात आले होते. राज्य सरकारकडून यापार्श्‍वभुमीवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात शपथपत्र दाखल केलेले आहे. राज्यातील सिंचन घोटाळयाचा संथगतीने होत असलेल्या तपासावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्‍त केलेली आहे. त्यामध्येच आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. आरोप-प्रत्यारोप होत आहेत. अलिकडेच शिवसेनेने अजित पवार यांच्यावर कडवी टिका केली होती. त्यानंतर आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांच्या अटकेची शक्यता वर्तविली आहे. अजित पवार यांच्या दारात पोलिस उभे, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असे ते अटल संकल्प महासंमेलनात बोलताना म्हणाले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सत्‍ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी असे विधान केल्याने तर्कवितर्क काढले जात आहेत.

अटल संकल्प महासंमेलनास महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, बाळा भेगडे, पिंपरीचे पक्ष नेते एकनाथ पवार, आझमभाई पानसरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, खासदार अमर साबळे, पिंपरीचे महापौर राहुल जाधव आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

अनाधिकृत बांधकामांचा प्रश्‍न सोडविणार  :- अटक संकल्प महासंमेलनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामांचा प्रश्‍न निश्‍चितच आमचे सरकार सोडवणार असल्याची ग्वाही दिली. पिंपरी-चिंचवड शहराला अनाधिकृत बांधकामांचा प्रश्‍न सध्या मोठया प्रमाणावर भेडसावत आहे. मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्‍न सोडविण्याची ग्वाही दिल्याने पिंपरी-चिंचवडकरांनी राज्य सरकारकडून दिवाळीची भेट मिळाली आहे.

जाहिरात