पोलीस स्टेशन मधील स्टेशन डायरी आता होणार कालबाह्य 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद ठेवण्यासाठी असणारी स्टेशन डायरी आता हद्दपार केली जाणार आहे. पोलिसात केल्या जाणाऱ्या तक्रारी आणि दिवसभरात पोलीस स्टेशन मध्ये घडणाऱ्या घटना यांचा इतिवृत्तांत नोंदी मध्ये बंदिस्त करणारी स्टेशन डायरी आता कालबाह्य होणार आहे. ठाणे अंमलदाराच्या टेबलवर असणारी हि स्टेशन डायरी भल्या भल्यांना धडकी भरवत होती कारण एकाद्या राजकीय नेत्याने जर एकाद्या प्रकरणात हस्तक्षेपासाठी फोन केला तर तसा फोन आल्याची नोंद एकदा हुशार अंमलदार स्टेशन डायरीत करत असे आणि मग नंतर राजकीय नेत्यांपुढे मोठा पेच निर्माण होत असे. स्टेशन डायरी मुळे राजकीय नेते अडचणीत आल्याचे कित्येक प्रकार या महाराष्ट्राने आजवर पहिले आहेत.

आज पासून स्टेशन डायरीमध्ये नोंदी करणे बंद करून नवीन संगणक प्रणालीतच गुन्ह्यांची नोंद घेण्याचे लेखी आदेश गुरुवारी राज्याच्या पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत. पडसलगीकर यांच्या आदेशानुसार राज्यातील १० पोलीस आयुक्तालये आणि ३६ पोलीस अधीक्षक कार्यालयांच्या कक्षेतील पोलीस ठाणी डायरीमुक्‍त करण्यात आली आहेत.

पोलीस खाते कात टाकते आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा लाभ घेऊन पोलीस खात्यात अधिक सक्षमता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न अलीकडच्या काळात घडून आले आहेत. लाकडी काठ्या जाऊन त्या जागी आता फायबरच्या काठ्या आल्या आहेत. पोलिसांच्या बेड्याही आता पहिल्यापेक्षा अधिक कडक कठोर झाल्या आहेत. तसेच पोलीस नाईक ते पोलीस हवालदार यांच्या पदोन्नती नंतर खांद्याला लावण्यात येणारी फीत हि बदलण्यात आली आहे. फितीची जागा आता रिबीनने घेतली आहे. पोलीस स्टेशन मध्ये आता स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे, तसेच पोलीस स्टेशन आता स्मार्ट बनवण्यात आली आहेत. एवढा कायापालट झालेल्या पोलीस स्टेशनमध्ये राहिली होती ती म्हणजे स्टेशन डायरी ती डायरी आता निरोप घेऊन सर्वांना सोडून जाते आहे. स्टेशन डायरी जाऊन सीसीटीएनएस प्रणालीवर गुन्ह्यांची व तक्रारी नोंद घेतली जाणार आहे म्हणून स्टेशन डायरी कालबाह्य होणार आहे.

१५ सप्टेंबर २०१५ पासून प्रायोगिक तत्वावर संगणक प्रणाली करण्यात आली होती . त्यानंतर आता हि संगणक प्रणाली सर्वत्र लागू करण्याचे आदेश पोलीस महासंचालक  यांनी दिले आहेत त्यामुळे स्टेशन डायरी आता कायमची निरोप घेऊन गेली आहे. आता तक्रारीची आणि गुन्हांची नोंद हि ऑनलाईन स्वरूपात करावी लागणार आहे. तसेच दिवसभरात जिल्ह्यात नोंदल्या गेलेल्या गुन्ह्यांची आणि तक्रारीची एकत्रित प्रिंट प्रत्येक रात्री काढून तो अभिलेख जतन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत.