जिगरबाज पोलीस उपनिरीक्षकामुळे वाचले ‘त्या’ दोघींचे प्राण

पुणे : पुष्कराज दांडेकर – सकाळची वेळ… दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मुली दुचाकीवरून जात असताना अचानक समोर वाहन आल्याने त्यांची दुचाकी घसरली आणि दोघी खाली पडल्या जोरात खाली पडल्याने एकीला फिट आले. त्यानंतर तेथून जाणाऱ्या वाहनचालकांची गर्दी जमते. त्याचवेळी पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील तेथून कामावर निघाले होते. त्यांनी दुचाकी थांबवली.  परिस्थितीचे गांभीर्य पाहात तात्काळ येणाऱ्या एका कारला थांबवून त्यांना थेट केईएम रुग्णालयात दाखल केले. जिगरबाज पोलीस उपनिरीकामुळे त्या मुलीला लवकर उपचार मिळाल्याने ती सुखरुप आहे. त्यामुळे त्यांची आई वडीलांनी दिनेश पाटील यांचे आभार मानले आहेत.

सोमवार असल्याने पुणे सोलापूर रस्त्यावर सकाळी वाहनांची गर्दी होती. सकाळी कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी सर्वांची धावपळ सुरु असतानाच वैष्णवी शर्मा व तणवी ढोमे या दस्तूर शाळेत शिकणाऱ्या दोन मैत्रिणी दुचाकीवरून जात होत्या. रेसकोर्सच्या गेटसमोर आल्यावर समोर वाहन आल्याने दुचाकीचे ब्रेक लागले.

मात्र दुचाकी घसरल्याने दोघी दुचाकीसह खाली पडल्या. दोघींनाही चांगलेच खरचटले होते. त्यातील एका मुलीला फीट आली. त्यामुळे रस्त्यातच तिच्या तोंडातून फेस येऊ लागला आणि दोघीही जागेवरच पडून होत्या. तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी वाहने थांबवली. त्याचवेळी गुन्हे शाखेच्या युनीट एकमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील आपल्या दुचाकीवरून आयुक्तालयात जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला. तेथून जाणाऱ्या जया रंगनानी (रा. सोपानबाग घोरपडी ) याना थांबविले. त्यानंतर त्यांच्या कारमध्ये दोघींना बसवून स्वत: आणि युवक रवि मठपती यांना सोबत घेऊन पेलेटिंग कर थेट केईएम रुग्णालय गाठले. त्यानंतर त्यांच्या आई वडीलांना यासंदर्भातील माहिती दिली. ते देखील रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी दिनेश पाटील यांचे आभार मानले.