आयपीएस अधिकारी कार्तिक, प्रियंका कश्यप यांची बदली

पणजी : वृत्तसंस्था – गोवा पोलिस खात्यात अधीक्षकपदी पाच वर्षांपासून कार्यरत असलेले आयपीएस अधिकारी कार्तिक कश्यप व त्यांच्या पत्नी प्रियंका कश्यप यांची गोव्यातून मिझोरम राज्यात बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएस अधिकारी अस्लम खान (2007 केडर)  व पंकज सिंग (2008) या दोन आयपीएस अधिकार्‍यांची दिल्लीतून गोव्यात बदली करण्यात आली आहे. या बदली संदर्भातील आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने शुक्रवारी (दि. 11) जारी केला. कार्तिक कश्यप यांच्याकडे सध्या गुन्हा अन्वेषण विभाग, सायबर क्राईम विभागाच्या अधीक्षकपदाचा तर प्रियंका कश्यप यांच्याकडे भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या अधीक्षकपदाचा ताबा आहे.

2009 सालच्या केडरचे आयपीएस अधिकारी असलेले कश्यप दाम्पत्य हे दिल्ली येथून 2013 साली गोव्यात बदली होऊन आले होते. तेव्हापासून म्हणजेच पाच वर्ष ते गोव्यातच होते. सिव्हील इंजिनिअरिंग पदवीधर असणारे कार्तिक यांनी अमली पदार्थ विरोधी पथक, आर्थिक गुन्हा अन्वेषण, क्रीडा विभाग, सायबर गुन्हे, दहशतवाद विरोधी पथक, राज्य गुन्हा अहवाल विभागात काम केले आहे. कश्यप दाम्पत्याची दोन वर्षांपूर्वी गोव्यातून दिल्लीत बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांनी ही बदली स्वीकारली नव्हती.