१ हजाराची लाच घेणारा पोलीस काॅस्टेबल ‘एसीबी’च्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा आॅनलाइन – गुन्ह्यातील व्यक्तीला जामिनावर सोडण्यासाठी आणि अधिक काही कारवाई न करण्यासाठी १ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या वेदांतनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला रंगेहात पकडण्यात आले आहे. योगेश पंडित सूर्यवंशी (२७, रा. इम्पॅक्ट सेंटर, पडेगाव) असे या पोलीस शिपायाचे नाव आहे.

तक्रारदार खासगी कंत्राटदार असून त्यांच्या पत्नी आणि भावाच्या विरोधात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. पत्नीला अटक केल्यानंतर जामिनावर सोडण्यात आले होते. मात्र भाऊ तडीपार असल्याने त्याला अटक झालेली नव्हती. तक्रारदाराने १५ नोव्हेंबर रोजी भावाला वेदांतनगर पोलीस ठाण्यात नेले होते. त्या पाठोपाठ तक्रारदारांची आईही पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यावेळी पोलीस शिपाई असलेल्या योगेश सूर्यवंशी याने भावाला जामिनावर सोडण्यासाठी आणि अधिक काही कारवाई न करण्यासाठी १ हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याची माहिती आईने मोबाईलद्वारे तक्रारदाराला कळविली.

मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रेस नगरमधून प्रारंभ

आईने आपला मुलगा जामीनदार घेऊन आणि पैसे घेऊन थोड्याच वेळात येणार असल्याचे सांगून निघून आल्या. तक्रारदाराला सूर्यवंशी याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेच्या मागणीच्या पडताळणीसाठी पंचासमक्ष तक्रारदाराला पाठविले. त्यावेळी पोलीस शिपाई योगेश सूर्यवंशी याने भावाला सोडविण्यासाठी व अधिक कारवाई न करण्यासाठी तपासिक अंमलदार जाधव यांना देण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडून १ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर लाचेचा सापळा रचण्यात आला. वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील बीट अंमलदार यांच्या कक्षात तक्रारदाराकडून १ हजार रुपयांची लाच स्वीकारताना योगेश पंडितला रंगेहात पकडण्यात आले.