पुणे : न्यायालयाच्या आवारातच पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सराईत गुन्हेगारांना न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना लष्कर न्यायालयात घडली. ही घटना बुधवारी (दि.९) दुपारी सव्वादोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोघांवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

मोहसीन अब्बास शेख (वय-२२) मुजमील उर्फ मुज्जु मजित खान (वय-२३) अशी सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई सुधीर शिवाजी खटवड (वय-५६) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी हे सराईत गन्हेगार असून त्यांच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात १४ गुन्हे दाखल आहेत. या दोघांना लष्कर न्यायालयात हजर करण्यासाठी काल दुपारी सव्वादोनच्या सुमारास सुधीर खुटवड यांनी न्यायालयात घेऊन आले होते. आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांच्या जिवीतास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षणात आणण्यात आले होते. त्यावेळी दोघांना भेटण्यासाठी त्याचे मित्र न्यायालयाच्या आवारात आले होते. त्यावेळी फिर्य़ादी सुधीर खुटवड यांनी आरोपींना भेटण्यास मनाई केली. मित्रांना भेटण्यास नकार दिल्याने आरोपींनी खुटवड यांना धक्काबुक्की करुन जिवे मारण्याची धमकी दिली. सुधीर खुटवड यांनी दिलेल्या फिर्य़ादेवरुन सरकारी कामात अडथळा निर्माण करुन मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लष्कर पोलीस करीत आहेत.