पोलीसाचाच भाऊ निघाला चोर, ‘असा’ अडकला पोलीसांच्या जाळ्यात

उदगीर : पोलीसनामा ऑनलाइन – उदगीर शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. चोरांची टोळी शहरात कार्यरत आहे की काय, असा अंदाज बांधत पोलिसांचे पथक तयार करून तपास सुरू झाला आणि चोरीच्या १८ दुचाकींसह एक आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी मेकॅनिक असून नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या एका पोलिसाचा तो भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन वर्षांपासून दुचाकी चोरीच्या अनेक घटना उदगीर शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडल्या आहेत. शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक फौजदार अहमद पठाण यांची दुचाकी गेल्या महिन्यात भरदिवसा पोलीस ठाण्यासमोरून चोरीस गेली होती तर देऊळवाडी येथील बसचालक रत्नेश्वर बाबूराव गोगे यांची दुचाकी उदगिरातून चोरीस गेल्याचा गुन्हा २९ नोव्हेंबर २०१८ रोजी शहर पोलिसांत दाखल झाला होता. शिवाय अनेक दुचाकी चोरीस गेल्याने पोलीस निरीक्षक गोवर्धन भुमे यांनी यासाठी एक विशेष पथक तयार केले. त्यात पोहेकॉ सुधाकर केंद्रे, पोहेकॉ. विलास फुलारी, पोना महेश खेळगे, पोना राजू घोरपडे, पोना कृष्णा चामे, पोकॉ. श्रीहरी डावरगावे, पोकॉ. बाळू आगलावे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

शहरातील चोरी गेलेल्या दुचाकींची माहिती काढण्यात येत होती. लातूर येथील बाभळगाव रोडवर असलेल्या एका पेट्रोलपंपावर काम करणारे बालाजी येलगटे यांना एक चोरीची दुचाकी विक्री करण्यात आल्याची माहिती मिळाली. तेव्हा या पथकाने लातूर येथे जाऊन सदरची दुचाकी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता उदगिरात मेकॅनिक असलेला हुसेन नागनाथ कांबळे याने खोटे कारण सांगून दुचाकी विक्री केल्याची माहिती समजली. ९ जानेवारी रोजी शहर पोलिसांनी हुसेन नागनाथ कांबळे यास अटक केली असता त्याने सदरची दुचाकी चोरी करून विक्री केल्याचा कबुलीजबाब पोलिसांना दिला. चौकशीत आरोपीचा भाऊ नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत असल्याचे समजले.