मोदींच्या सभेमुळे प्रणिती शिंदेंची जागा धोक्यात 

सोलापूर : पोलिसनामा ऑनलाईन – भाजपने सोलापुरात सभा घेत लोकसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोलापुरात 30 हजार घरांचे भूमीपूजन केलं. त्यावेळी झालेल्या त्यांच्या दमदार सभेमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. मात्र त्यांच्या या सभेने काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे.

2014 ला मोदी लाट असतानाही सोलापूरात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली होती. मात्र आता मोदींच्या सभेमुळे प्रणिती शिंदेंच्या मतदारसंघातील अडचणी वाढल्या आहेत. सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात कामगारांची संख्या मोठी आहे. याच कामगारांवर राजकीय नेत्यांचं भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे कामगारांची मते ही येथे निर्णायक ठरतात. त्यात माकपचे आमदार नरसय्या आडम यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या रेनगर फेडरेशच्या 30 हजार घरांच्या भूमीपूजनाने मोदींच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यातूनच भाजपने प्रणिती शिंदेंचा मतदारसंघ माकपच्या माध्यमातून पुन्हा खिळखिळा करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे तेथील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत.

नरसय्या आडम यांनी काँग्रेस काळात दहा हजार घरांचा प्रकल्प पुर्ण केला होता. आता भाजप सरकारच्या माध्यमातून त्यांनी 30 हजार घरांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पाडला. यातूनच त्यांना पुन्हा आमदार होण्याची संधी असल्याचं बोललं जातंय. कारण नरसय्या आडम यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलेलं महाराष्ट्राने पाहिलं आहेच. त्यात भाजप माकपच्या नरसय्या रेड्डींना बळ देताना दिसत आहे, तर भाजपचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना सभेच्या आयोजनापासून दूर ठेवत आहेत, असं चित्र दिसत आहे. त्यामुळे भाजप आपला लोकसभा उमेदवार बदलण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.

विरोधक काही करत असले तरी ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वावर मतदार मोठा विश्वास टाकत असून, पुन्हा एकदा राज्यात आणि देशात काँग्रेसची सत्ता येईल, असा दावा प्रणिती शिंदेनी केला आहे.

दरम्यान, मोदींच्या सभेला मोदींना ऐकण्यासाठी तुफान गर्दी जमली होती. ‘मोदी, मोदी’चा नारा जोरात होत होता. यावेळी मोदींनीही भाषणाची सुरुवात मराठीत केली. भाषण हिंदीत करत समारोप कन्नडमध्ये केला. त्यामुळे मोदींनी यावेळी जनतेची मने जिंकली. त्यामुळे आता 2019 मध्ये सोलापूरात राजकीय घमासान पाहायला मिळणार आहे.