अधिकारी होण्यासाठी अवैध राजमार्ग ; MPSC परीक्षेत ग्रुप कॉपीची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षेची प्रवेशपत्रे उपलब्ध झाली आहेत. मात्र या परीक्षेत सामूहिक कॉपी होण्याची शक्यता आहे कारण बैठक व्यवस्था उमेदवारांच्या मोबाइल क्रमांकानुसार निश्चित करण्यात आली आहे. काही उमेदवारांचे मोबाइल क्रमांक हे एकापाठोपाठ असल्याने त्यांचे आसन क्रमांकही एकापाठोपाठ आले आहेत.

MPSC’ने मोबाइल क्रमांकाच्या आधारे परीक्षा बैठक क्रमांक देण्याची पद्धत २०१७-१८ सालापासून अवलंबली आहे. MPSC परीक्षा देणार्‍यांना अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक नोंदविणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोबाईल क्रमांकाचे शेवटचे दोन डिजिट ग्राह्य धरून परीक्षा क्रमांक देण्यात येतो. त्यामुळे मागील काही महिन्यांत आपल्याला सोयीच्या उमेदवाराशी मिळते-जुळते मोबाईल क्रमांक मिळवून उमेदवार MPSCकडे नोंदणी करतात. अशा प्रकारे एकापाठोपाठ परीक्षा क्रमांक असणारे उमेदवार एकमेकांना मदत करून पास होत असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील ठरावीक खासगी क्लासमध्ये शिकवणी घेणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्याचा आरोप करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या प्रकाराची तक्रार ‘MPSC’कडे केली आहे.

सुरूवातीच्या काही परीक्षांत लागोपाठ क्रमांक असणारे उमेदवार यशस्वी होण्याचे प्रमाण कमी होते. मात्र अलिकडेच झालेल्या पोलीस निरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण २७०० उमेदवारांपैकी ११२० तर कृषी विभागाच्या परीक्षेत ६१०० पैकी ३००० यशस्वी उमेदवार हे मागे-पुढे क्रमांक असणारे आहेत.

गैरप्रकार करणारांवर कारवाई करू
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी मोबाइल क्रमांकाद्वारे बैठक क्रमांक मिळवण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही; मात्र अशा उमेदवारांचे प्रमाण कमी आहे. गैरप्रकार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची माहिती एमपीएससी प्रशासनाला द्यावी. त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई करू. प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या उमेदवारांनी अभ्यास करावा. परीक्षेत कोणताही गैरप्रकार होणार नसल्याचे ‘एमपीएससी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.