‘पीपीएल’ शुटींग बाॅल स्पर्धा : आयपीएलच्या धर्तीवर पीपीएलचे आयोजन 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे यावर्षी आयपीएलच्या धर्तीवर निमंत्रितांसाठी ‘पीपीएल शुटींग बॉल-आमदार चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एस. एम. चैतन्य स्पोर्टस असोसिएशनच्या वतीने १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांनी दिली.

पुणे जिल्हा शुटींग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येणाऱ्या ‘पिंपरी पेंढार प्रिमिअर लिग’-‘आमदार चषक’ स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी (दि.१२) रोजी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस किशोरशेठ दांगट, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुलशेठ बेनके उपस्थित राहणार आहेत. यावेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांचा ‘चैतन्य पुरस्काराने’ गौरव करण्यात येणार असून, गावातील माजी सैनिकांचा ‘शौर्य सन्मान’ केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी विजेत्यांना चषक आणि एकूण ७० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून, खेळाडूंची प्रवास खर्च व भोजन व्यवस्था करण्यात आली आहे.

दहा संघामध्ये होणाऱ्या स्पर्धेत जळगाव, मालेगाव, सोलापूर, सांगली, पुणे, कोल्हापुर, औरंगाबाद येथील राष्ट्रीय पातळीवरील नावजलेले संघ व नामवंत खेळाडू सहभागी होणार आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लेंडे, विघ्नहर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन रामदासशेठ वेठेकर यांच्या हस्ते होणार आहे, असे चव्हाण यांनी यावेळी सांगितले. अधिक महितीसाठी ९५६१३१३७३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.