पुण्यातून प्रवीण गायकवाड काँग्रेसचे उमेदवार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (मल्हार जयकर) – आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून प्रवीण गायकवाड हे काँग्रेसपक्षाचे उमेदवार असतील हे आता निश्चित झाले असून राहुल गांधींच्या या उमेदवार निवडीला शरद पवार यांनीही संमती दिली असल्याचे समजते.

छाजेड, जोशी, शिंदे यांची नावे हायकमांडकडे

पुण्यातून काँग्रेसच्यावतीने लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी अभय छाजेड, मोहन जोशी, अरविंद शिंदे, बाळासाहेब शिवरकर, अनंत गाडगीळ आणि संजय काकडे हे इच्छुक आहेत. शहर काँग्रेस कमिटीच्यावतीनं हायकमांडकडे छाजेड, जोशी आणि शिंदे यांचीच नावे गेली आहेत. आपले नाव पाठविले नाही हे कळताच शिवरकर यांनी शहराध्यक्ष रमेश बागवे यांना जाब विचारला. त्यांच्याशी वादही घातला. इच्छुकांनी आपापल्या परीने त्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. पण वरिष्ठांच्या मनांत ही गेलेली जागा पुन्हा जिंकायची असेल तर तसाच तगडा उमेदवार हवाय! यासाठी प्रवीण गायकवाड यांच्या नावाला अंतिम पसंती दिल्याचे समजते. यावर प्रवीण गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याकडे निवडणूक लढविण्याबाबत चौकशी केली गेलीय पण या अधिक काही सांगण्यास त्यांनी नकार दिला.

लोकसभेनंतर राज्य नेतृत्वात बदल

गुजरात विधानसभेच्या निवडणुकांदरम्यान मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे निघालेले मोर्चे पाहून काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासाठी काँग्रेसचं राज्यस्तरावर नवं नेतृत्व तेही मराठा समाजातलं हवं म्हणून नव्या नेत्याचा शोध घेण्याचा आदेश केंद्रीय समितीतील नेत्यांना दिला. तेव्हापासून त्यांनी राज्यात काँग्रेसपक्षाची सूत्रं चांगल्याप्रकारे सांभाळणारा नेता म्हणून त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे चाचपणी केली पण ते भाजपमध्ये गेले. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचा विचार सुरू असतानाच त्यांनी भाजपत प्रवेश केला. नारायण राणे यांचा पूर्वानुभव असतानाही त्यांच्या नांवाची चर्चास सुरू झाली तोच त्यांनी भाजपला जवळ केलं. त्यामुळं प्रस्थापित नेत्यांऐवजी नव्या दमाच्या नेत्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा मराठा समाजाच्या या भव्य ताकदीमागे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांचं नांव समोर आलं.

राहुल गांधींचे दूत महाराष्ट्रात

राज्यातील काँग्रेसपक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतला असून पक्षाचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी दिल्लीतून सूत्रे हालताहेत. आगामी लोकसभा पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचं लक्ष्य त्यांनी ठेवलं असून त्यासाठी त्यांची यंत्रणा महाराष्ट्रात येऊन दाखल झाली असून सध्या चाचपणी सुरू असल्याचे समजते. सध्याच्या प्रस्थापित नेतृत्वामुळे नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. तेच तेच चेहरे काँग्रेसचे नेतृत्व करीत राहिल्यानं महाराष्ट्रतल्या जनतेनं काँग्रेसला दूर लोटलं आहे. याची जाणीव राहुल गांधींना झालीय. त्यासाठी राज्यात केंद्रीय इंटलीजन्स ब्युरोचे माजी प्रमुख यांना राहुल यांनी पाठविलं असून त्यांनी राज्यातल्या काही जणांच्या गाठीभेटी घेतल्या असून त्यातील काहींना थेट राहुल गांधींनी संपर्क साधला असून दिल्लीत भेटीही घेतल्या आहेत. मात्र राज्यातल्या प्रस्थापित नेत्यांना यापासून दूर ठेवण्यात आहे आहे. यातील काहींना लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याचे समजते.

छत्तीसगढ इथं राहुल आणि प्रवीण यांची भेट

केंद्रीय इंटेलिजन्स ब्युरोच्या या माजी प्रमुखांनी संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांची भेट घेतली असून त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चादेखील केल्याचे समजते. त्यानंतर प्रवीण गायकवाड आणि राहुल गांधी यांची या इंटेलिजन्स ब्युरो प्रमुखांच्या माध्यमातून छत्तीसगढ इथं भेट झाली. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर गायकवाड यांना राहुल गांधी यांनी दिल्लीला बोलावून घेतले. इथं सविस्तर चर्चा झाली. त्यानंतरही दोनवेळा गायकवाड यांना बोलावून घेतलं होतं. एका बैठकीत राहुल गांधी यांनी प्रवीण गायकवाड यांना ‘आपल्याला काय आणि कोणतं पद दिलं तर काँग्रेसमध्ये याल?’ अशी विचारणा केली. त्यावेळी गायकवाड यांनी ‘मला वैयक्तिक काही नको माझ्या समाजासाठी तुम्ही काय देणार यावर मी ठरविन.’ असं स्पष्ट केलं. त्यावर गांधींनी ‘आपल्या मनांत जे समाजासाठी काही करायचं आहे ते सारं करण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन.’ असं आश्वासन दिलं.

काँग्रेस संपविणाऱ्यांना उमेदवारी कशी ?
नुकतंच अचानकपणे राहुल गांधींनी प्रवीण गायकवाड यांच्याकडं ‘आपण पुण्यातून लोकसभा लढवणार का? असा थेट प्रश्न केला. त्यावर गायकवाड यांनी विचार करून सांगतो असं स्पष्ट केलं. त्याचवेळी पुण्यातून लोकसभेसाठी सतीश मगर यांच्याशीही संपर्क साधला. पण :आपण राजकारणापासून दूर असून मला त्यात रस नाही.’ असं सांगून टाकलं. दरम्यान संजय काकडे यांनी राहुल गांधींची भेट घेऊन आपण पुण्यातून काँग्रेसच्यावतीनं लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं. यावर गांधी यांनी ‘संजय काकडे यांनी आपलेच कार्यकर्ते भाजपमध्ये नेऊन काँग्रेस संपवली आहे. अशांना कशी उमेदवारी द्यायची? अशी पृच्छा गांधींनी आपल्या नेत्यांशी बोलताना केली.

राहुल-पवार यांच्या चर्चेनंतर उमेदवार निश्चित

राज्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झालीय. जागा वाटप झालंय. उमेदवारी देतानाही राहुल गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली असल्याचे समजते. महाराष्ट्रातल्या जागा जास्तीतजास्त कशा जिंकता येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसपक्षाच्या उमेदवाराच्या पाठीशी कशी राहील यासाठी विचारविमर्ष झाल्याचे समजते. राज्यातल्या काँग्रेसच्या दोन खासदारांच्या जागा वगळता इतर ठिकाणी शरद पवार यांच्याशी सध्या सल्ला मसलत सुरू आहे. त्यावर ‘उमेदवार माझा असेल पण त्याचा पक्ष काँग्रेस असेल! त्याला निवडून आणण्याची जबाबदारी माझी राहील.’ असं पवारांनी गांधींना सांगितल्याचे समजते. पवार यांनी पुण्यातून प्रवीण गायकवाड यांना उमेदवारी देण्यास अनुकूलता दर्शविलीय. त्यामुळं थेट राहुल गांधींचा उमेदवार म्हणून संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाजाचे नेते प्रवीण गायकवाड हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक काँग्रेसच्यावतीने लढवतील हे आता निश्चित झालंय.