सीतपूर येथे कत्तलखान्यावर छापा

 मिरजगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यातील सीतपूर शिवारातील कुरेशी मळा या ठिकाणी गोवंश हत्या आणि मांसाची तस्करी केली जात असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता वरील ठिकाणी छापा टाकला असता. तेथे मोठ्या प्रमाणात गोमांस व चारचाकी दोन मालवाहतूक वाहनांसह एकूण ८ लाख ८६ हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी अकरा जणांविरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत उर्वरित आठजण पसार झाले. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखा व कर्जत पोलिस यांनी संयुक्तरित्या बुधवारी सायंकाळी केली. यामध्ये गुन्हा अन्वेषण शाखेचे पी.एस.आय. गणेश इंगळे, पोलिस हे.कॉ.सय्यद, पोलिस नाईक आडबल,पो.कॉ.सोळुंके, पाथुरकर, पोलिस नाईक चालक बेरड, कर्जतचे पोलिस उपनिरिक्षक एस.पी.माने, मेढे एस.पी, पो.हे.कॉ.प्रल्हाद लोखंडे, दत्तात्रय कासार, सुनिल माळशिकारे, जालिंदर माळशिकारे आदींचा समावेश होता.

या कारवाईत अटक केलेल्या तीन आरोपींना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.या प्रकरणी महंमद कुरेशी (वय ४०,रा.कुरेशी नगर, कुर्ला, मुंबई), मोहसीन कुरेशी (वय-३७ रा.कोठला झोपडपट्टी ,अ.नगर), व गणेश शांताराम कुऱ्हाडे (वय-२६ रा.आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

तर सद्दाम कुरेशी, इस्माईल कुरेशी (दोघे रा.खडकत ता.आष्टी जि.बीड),गफ्फार कुरेशी, साहिल कुरेशी, साजिद कुरेशी, सिराज व हक्कू (पूर्ण नाव माहित नाही ) (सर्व रा.मुंबई व अब्दुल हक्क कुरेशी रा.अ.नगर) हे आठजण पसार झाले आहेत. त्यांच्या शोधार्थ पथके पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी दिली.यावेळी १८ गायी व बैल तसेच लहान २१ संकरित वासरे पांझरपोळ अहमदनगर येथे पाठविण्यात आले.

पशुवैद्यकीय आधिकारी डॉ.सुभाष साळुंके, कर्मचारी नितिन कोरडे यांनी घटनास्थळी जावून जनावरांना औषध उपचार करून आरोग्य तपासणी केली. तसेच कत्तल केलेल्या जनावरांचे शवविच्छेदन केले. यावेळी यांना पशुमित्र डॉ.संदीप शिंदे, पप्पू जवणे यांनी सहकार्य केले.