निनावी तक्रारीमुळे उलगडा झालेल्या खुनातील आरोपींना तुरुंगवास

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – निनावी तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर खुनाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज जिल्हा व सत्र न्यायालयात सिद्ध झाला. न्यायालयाने संजय ढापसे व इतर दोघांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी तुरुंगातच होते.

आरोपी संजय शिवाजी ढापसे (वय 45, रा. वंजारगल्ली, रामचंद्र खुंटाजवळ) याला तीन वर्षे तुरुंगवास व एक हजार रुपये दंड, बबलू उर्फ सर्फराजउद्दीन निजामुद्दीन शेख (रा. झेंडीगेट), अशोक ऊर्फ पिंटू गायकवाड (वय 29, रा. चौपाटी कारंजा) या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी प्रत्येकी एक वर्षे कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली.

याबाबत माहिती अशी की, 20 जुलै 2015 रोजी संजय मदनलाल डोशी हे त्यांच्या मित्रांसमवेत जेवण करण्यासाठी हाँटेल अशोका येथे गेले होते. तेथे डोशी यांचे ढापसे याच्यासोबत वाद झाले. त्यामुळे हॉटेलच्या मॅनेजरने दोघांनाही बाहेर काढले होते. ढापसे व त्याच्या इतर दोन साथीदारांचा मारहाणीमुळे डोशी हे जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना 26 जुलै 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. डोशी यांच्या जखमाबाबत त्यांच्या कुटुंबीयांना माहिती नसल्यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांनी कोठेही तक्रार नोंदवलेली नव्हती. परंतु, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्याकडे निनावी पत्र प्राप्त झाले होते. त्या पत्राच्या आधारे डॉ. त्रिपाठी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले होते. अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी हॉटेल अशोका येथे जाऊन सीसीटीव्ही बाबत विचारणा केली असता हॉटेल चालकाने ढापसे व मयत यांच्यात वादावादी झाल्याचे सांगितले. तसेच सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज घटनेच्या दुसऱ्या दिवशी काही लोकांनी येऊन डिलीट केले, असे सांगितले.

मात्र या हॉटेल समोरील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ढापसे व इतर दोघे डोशी यांना  यांना मारहाण करतानाचे चित्रीकरण कॅमेरात कैद झाले होते. त्याआधारे 6 ऑगस्ट 2015 रोजी धापसे व इतर दोघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा प्राथमिक तपास पोलिस उपाधीक्षक आनंद भोईटे यांनी केला. त्यानंतर हा तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिलीप चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला. चव्हाण यांनी गुन्ह्यातील साक्षीदारांचे सीआरपीसी 164 अन्वये न्यायालयासमोर जबाब नोंदविले होते.

केवळ निनावी पत्रावरून पोलिसांनी सखोल तपास करून गुन्हा दाखल करून संजय ढापसे व इतर दोघांना अटक केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनीही काही तपास केला होता. अटक झाल्यापासून  आरोपी ढापसे हा न्यायालयीन कोठडीत होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. माने यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपींना खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाल्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान सरकारी पक्षासमोर होते. सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी काम पाहिले.