प्रियांका चोप्राच्या होणाऱ्या नवऱ्याला १३ वर्षापासून आहे ‘हा’ आजार

मुंबई : पोलीसनामा आॅनलाईन – ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्राचा होणारा नवरा निक जोनास सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याला कारणही तसेच आहे.  निकने त्याच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर एक पोस्ट केल्यामुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ‘क्वांटिको गर्ल’ प्रियांका चोप्रा लवकरच अमेरिकन गायक निक जोनाससोबत लग्नगाठ बांधणार आहे. हे दोघंही राजस्थानमधील जोधपूर येथे ३० नोव्हेंबर रोजी लग्न करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून या दोघांची चर्चा रंगली आहे. निकने काही वेळापूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याला मधुमेह झाल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्याने त्याचा १३ वर्षांपूर्वीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.
‘१३ वर्षांपूर्वी मला ‘टाईप १’ चा मधुमेह झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं होतं. या आजारपणामध्ये माझ्या रक्तातील साखरेचं प्रमाण प्रचंड वाढलं होतं. त्यामुळे त्याचा परिणाम माझ्या वजनावर झाला. माझं वजन दिवसेंदिवस कमी झालं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासामध्ये मला मधुमेह झाल्याचं समोर आलं’, असं निकने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पुढे तो असंही म्हणाला, ‘मधुमेहाचं निदान झाल्यानंतर मी माझ्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला लागलो. त्यामुळे आजही मी खाण्यापिण्यात पथ्य पाळतो. वेळोवेळी ब्लड शुगर तपास असतो. त्यामुळेच आज माझा आजार नियंत्रणात आहे. माझ्या या आजारपणामध्ये माझ्या घरच्यांनी आणि मित्रपरिवाराने माझी साथ दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो’.
दरम्यान, निकने त्याच्या आजारपणाविषयी सांगितल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. निक लवकरच देसी गर्ल प्रियांकासोबत लग्न करणार असून त्याने प्रियांकासाठी एक आलिशान घर घेतल्याचंदेखील सांगण्यात येत आहे.