प्रियंका गांधींनी घेतला ‘त्या’ नेत्यांचा १८ तास क्लास

लखनौ : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणूक जशी जवळ येईल, तसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. तसेच काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय होऊन, धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील 41 मतदारसंघांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रियंका गांधी यांनी मंगळवारी नॉन स्टॉप बैठकांचा धडका लावला आहे.

त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांचा क्लास घेतला. प्रियंका गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे अनेक काँग्रेस नेत्यांची धांदल उडाली. काही जणांना तर त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बुथची संख्याही माहीत नव्हती. प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसोबतची बैठक मंगळवारी दुपारी 1. 20 वाजता सुरू झालेली बैठक बुधवारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांपर्यत सुरू होती. प्रियंका गांधी यांनी तहान भूक विसरून मॅरेथॉन बैठका घेतल्या.

या बैठकीदरम्यान फूलपूर येथील कार्यकर्त्यांनी फूलपूर येथून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. त्यावेळी प्रियंका गांधी म्हणाल्या की, ”मी निवडणूक लढवावी यासाठी अनेक ठिकाणाहून आग्रह होत आहे. मात्र मी निवडणूक लढणार नाही, तर संघटना भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

बैठकीत प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून घेतले. कुठल्या कार्यकर्त्याने अधिक वेळ घेतल्यास त्याला तसा अधिक वेळही देण्यात आला. त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधींकडे विविध तक्रारी केल्या. तसेच संपूर्ण उत्तर प्रदेशात रायबरेली फॉर्म्युला लागू करण्यात येणार असल्याचेही संकेत दिले. मात्र आता लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याने संघटनेतील फेरबदल हे निवडणुकीनंतर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

या मॅरेथॉन बैठकीवेळी कार्यकर्ते प्रियंकांसोबत सेल्फी घेण्यास उत्सुक होते. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून प्रियंका यांनी सेल्फी घेऊ देण्यास नकार दिला. मात्र प्रत्येक बैठकीच्या शेवटी प्रियंका यांनी कार्यकर्त्यांसोबत ग्रुप फोटो घेतला. प्रियंकांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्तींनाच मोठी पदे मिळत असल्याची तक्रार केली. त्यावेळी सामान्य कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न असेल, असे प्रियंका गांधी यांनी सांगितले.