प्रियंकाच्या एंट्रीचा उत्तर प्रदेशात भाजपलाच फायदा

लखनौ : वृत्तसंस्था – काँग्रेसने प्रियंका गांधी यांना सरचिटणीस करुन त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशाची जबाबदारी दिली आहे. प्रियंका गांधीच्या राजकारणातील एंट्रीचा फायदा काँग्रेसला होईल, असे कोणालाही वाटत असेल तर ते उत्तर प्रदेशापुरते तरी खोटे ठरण्याची शक्यता आहे. उलट प्रियंका गांधींमुळे भाजपलाच फायदा होणार असून त्यांच्या जागा वाढणार आहेत. तसेच समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या महाआघाडीला बसणार आहे. खरे वाटत नाही ना पण, हे इंडिया टी व्ही आणि सीएनएक्स ने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे.

गेल्या दोन दशकापासून उत्तर प्रदेशात कमकुवत झालेल्या काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्या राजकारणातील प्रवेशाने उत्साह आला असला तरी काँग्रेसच्या मतदारांचा पाया येथे उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे प्रियंकांमुळे काँग्रेसची मते वाढली तरी त्यांच्या जागा वाढणार नाहीत. उलट पूर्वी भाजप व समाजवादी व बसप अशी दुरंगी लढत आता तिरंगी होईल व त्याचा फायदा भाजपला होईल असा या सर्व्हेक्षणाचा अंदाज आहे.

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी हडप करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश 

उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात लोकसभेच्या ४३ जागा आहेत. यातील जवळपास सर्वच जागांवर काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. याचा फटका महाआघाडीला बसू शकेल. उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील ४३ पैकी १९ जागांवर महाआघाडीला, २० जागांवर भाजपाला यश मिळेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेसला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावं लागू शकते़
प्रियंका गांधी सक्रीय राजकारणात येण्यापूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले होते़  त्यात पूर्वांचलमध्ये (उत्तर प्रदेशचा पूर्व भाग) काँग्रेसला रायबरेली आणि अमेठी या दोनच जागांवर यश मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर सपा-बसपाच्या महाआघाडीला २६ आणि भाजपाला १५ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

प्रियंका गांधी सक्रीय झाल्याने काँग्रेसच्या मतांमध्ये वाढ होईल, असा अंदाज आहे. मात्र त्यामुळे काँग्रेसच्या जागा फारशा वाढणार नाहीत. आधी काँग्रेसला दोन जागा मिळण्याचा अंदाज होता. प्रियंका गांधींमुळे त्यात फक्त दोनने वाढ होईल. काँग्रेसची मते वाढल्याचा मोठा फटका महाआघाडीला बसू शकतो. त्यांना आधी २६ जागा मिळण्याचा अंदाज होता. त्या आता १९ वर येऊ शकतात. म्हणजेच ७ जागांचे नुकसान होऊ शकते़  काँग्रेसची मते वाढल्याने भाजपाच्या मतांवरही परिणाम होईल. मात्र महाआघाडीला सर्वाधिक फटका बसल्याने भाजपाचा फायदा होऊ शकतो. त्यांना आधी १५ जागा मिळतील, असा अंदाज होता. मात्र आता त्यांना २० जागा मिळू शकतात. म्हणजेच ५ जागांचा फायदा होऊ शकतो.