बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : नगरसेवक सुभाष जगताप विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुभाष जगताप यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज (शुक्रवार) न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. जगताप आणि त्यांच्या पत्नीच्या विरोधात या संदर्भात सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांच्याकडे १ कोटी ३३ लाख ३७ हजार १५२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे.

जगताप यांच्या मालमत्तेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार जगताप यांच्या मालमत्तेबाबत चौकशी करण्यात आली होती. जगताप आणि कुटुंबीयांच्या मालमत्तेचे १९९२ ते २०१४ या दरम्यानचे परीक्षण करण्यात आले. त्यांच्याकडे १ कोटी ३३ लाख ३७ हजार १५२ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास पुणे विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त कांचन जाधव यांनी केला. तपासात १९९२ ते २०१४ या दरम्यानचे परिक्षण कालावधीमध्ये सुभाष जगताप आणि त्यांची पत्नी यांचे एकूण उत्पन्न १ कोटी ७४ लाख ७० हजार ५३५ रुपये होते. तर त्यांचा खर्च १ कोटी ४८ लाख २१ हजार २७७ रुपये होता. तसेच एकूण मालमत्ता १ कोटी ५९ लाख ८६ हजार ४१० रुपयांची असून यामध्ये जंगम व स्थावर मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुभाष जगताप यांचे एकुण उत्पन्न आणि कुटुंबाचा खर्च व मालमत्ता वजा करता त्यांच्याचे १ कोटी ३३ लाख ३७ हजार १५२ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली. सुभाष जगताप यांच्या विरुद्ध लाच लुचपत प्रतिबंध विभागाने शिवाजीनगर येथील विशेष न्यायालयात आज दोषारोपपत्र दाखल केले.

गुन्ह्याचा तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुण पोलीस उप आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.

सुडबुद्धीने कारवाई : नगरसेवक जगताप
राजकीय सूडबुध्दीने माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. झाडाझडतीत काही सापडेना म्हणून वेगवेगळे प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे. असंपदेबाबत आकडेवारीत तफावत आहे, जमीन प्रकरणात तथ्य आढळलेले नाही, अशी प्रतिक्रिया सुभाष जगताप यांनी दिली.