नीलेश राणेंच्या ‘त्या’ बेताल वक्तव्याचा शिवसैनिकांकडून निषेध

चिपळूण : पोलीसनामा ऑनलाइन – आमचे दैवत हिंदुहृदयसम्राट सन्मानीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल माजी खासदार नीलेश राणे यांनी जे बेताल वक्तव्य केले आहे, त्याचा आम्ही सर्व शिवसैनिक जाहीर निषेध करतो. यापुढे नीलेश राणेंना शिवसैनिक जशास तसे उत्तर देतील, असे शिवसेना चिपळूण शहरप्रमुख राजूशेठ देवळेकर यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

रत्नागिरी येथे ‘स्वाभिमान’चे सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. चिपळूण शहर शिवसेनेच्या वतीने नीलेश राणेंचा निषेध करण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख राजूशेठ देवळेकर यांच्या नेतृत्वाखाली चिंचनाका येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमून राणे यांचा निषेध केला. यावेळी नीलेश राणेंविरोधात घोषणा देण्यात आल्या.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजू देवळेकर, चिपळूण नगरपालिका शिवसेना गटनेत्या जयश्री चितळे, नगरसेवक मनोज शिंदे, भगवान बुरटे, विकी लवेकर, युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते, निहार कोवळे, विकी नरळकर, नगरसेविका सुमय्या फकीर, सई चव्हाण, राकेश देवळेकर, राजू कोळेकर, स्वाती देवळेकर उपस्थित होते.