पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे निवेदन सादर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे आज पुण्याचे निवासी जिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना वकिलांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सुचनेनुसार महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलने आवाहन केल्या नुसार आज ट्रस्ट असोसिएशन तर्फे सोमवारी वकिलांनी आंदोलन केले.

देशातील प्रत्येक न्यायालयात बार असोसिएशन करता स्वतंत्र इमारत, महिला वकिलांसाठी स्वतंत्र वकिल कक्ष, स्वच्छतागृहे आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, वकील आणि पक्षकार यांच्या कल्याणकारी योजनेसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, नवोदित वकिलांना पहिले पाच वर्ष दरमहा दहा हजार रुपये मानधन द्यावे, वकिलांच्या निवासस्थानाकरिता कमी मोबदल्यात जागा उपलब्ध करून द्यावी, इत्यादी मागण्या बार कौन्सिल आँफ इंडिया ने केल्या आहेत.

सोमवारी येथील धर्मादाय कार्यालयात या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दुपारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. शिवराज कदम जहागिरदार, ॲड.दिलीप हांडे व ॲड. अमृता गुरव-देशमुख यांनी वकिलांना मार्गदर्शन केले. यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी यांनी वकिलांच्या विविध मागण्यांसंबंधी ठराव मांडला. त्यास उपाध्यक्ष ॲड. मोहन फडणीस यांनी अनुमोदन दिले. सचिव हेमंत फाटे व खजिनदार ॲड. रजनी उकरंडे यांच्यासह ॲड. रंगनाथ ताठे, ॲड. सुनिल मोरे, ॲड. सतिश पिंगळे, ॲड. राजेश ठाकूर ॲड. साधना बाजारे इ. वकिलांनी शांततामय मोर्च्याद्वारे जावून निवासी जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले.