“पाकिस्तानविरुद्ध खेळले नाही तरी वर्ल्ड कप जिंकता येईल”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वातावरण तणावपूर्ण झाले आहे. त्याचे पडसाद कलाक्षेत्रासह इतर क्षेत्रातही उमटले आहे. या हल्ल्याबद्दल सर्वत्र पाकिस्तान विषय़ी आणि आतंकवाद्यांविषयी राग व्यक्त होत आहे. क्रीडा क्षेत्रातही याचे पडसाद उमटत आहेत. इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. लोकांच्या या मागणीला भारताचा ऑफ स्पिनर हरभजन सिंगने पाठिंबा दिला आहे. ‘भारतानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये. भारतीय टीम एवढी मजबूत आहे, की पाकिस्तानविरुद्ध न खेळताही वर्ल्ड कप जिंकेल, असा विश्वास हरभजनसिंगने व्यक्त केला आहे.

ही वेळ कठीण आहे. भारतावर हल्ला झालेला आहे. सरकार कडक कारवाई करेलच, पण क्रिकेटमध्येही आपण त्यांच्याशी संबंध ठेवता कामा नये. नाहीतर आहे तसंच सुरु राहिलं. आपल्याला देशासोबत उभं राहावं लागेल. क्रिकेट किंवा हॉकी कुठेच आपण पाकिस्तानशी खेळू नये, असं मत हरभजने व्यक्त केले.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. त्यानंतर भारतामधल्या वेगवेगळ्या स्टेडियममधून पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो हटवण्यात आले. तर क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय)ने देखील वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, अशी मागणी केली आहे.