ठरवलं तर सर्व पाकिस्तानही ताब्यात घेऊ : रामदास आठवले

चेंबुर : पोलीसनामा ऑनलाईन – पुलवामा हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. या शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पाकिस्तानशी युद्ध झाले तर काश्मीर तर आपल्या ताब्यात राहिलच, मात्र सर्व पाकिस्तानही ताब्यात घेतील एवढी ताकद भारतीय सैन्यात आहे, असा दावा त्यांनी यावेळी केला.

दहशतवादी हल्ल्यासारख्या प्रसंगात देश एकसंघपणे भारतीय सैनिकांच्या पाठीशी उभा राहतो. सैन्याचे मनोधैर्य उंचावण्यासाठी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे. रिपब्लिकन पक्ष सरकारच्या पाठीशी उभा आहे, असं त्यांनी यावेळी नमुद केलं.

दरम्यान, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारतीय सैन्यदलाच्या आणि केंद्र सरकारच्या पाठीशी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरून एकजुटीने उभे राहूया असे आवाहन यावेळी त्यांनी केले. सीमेपलीकडे असलेल्या अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी, देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.