Pulwama Terror Attack: नवज्योत सिंग सिद्धू यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे जनतेचा संताप 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानामुळे ते टीकेचे धनी झालेले दिसत आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत चर्चा करा असं मत त्यांनी व्यक्त केल्यानंतर आता याविषयी संताप व्यक्त होताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरल्याचे दिसत आहे. ४० पेक्षा जास्त जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू मात्र चर्चेची भाषा करत आहेत. यामुळे लोकांनी त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला आहे.

याबाबत बोलताना दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो असे नवज्योत सिंग सिद्धू म्हटले. याशिवाय फक्त चर्चेने पाकिस्तानसोबत असलेले संबंध सुधारले जातील असं विधानही त्यांनी केलं. पुढे बोलताना ते म्हणाले की, “या हल्ल्याचा निषेध आहे. हा भ्याड हल्ला आहे. चर्चेतून यावर कायमचा तोडगा काढला पाहिजे. कुठपर्यंत जवानांनी बलिदान द्यायचं ? कधीपर्यंत हा रक्तपात सुरु राहणार आहे ? ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. एकमेकांवर आरोप करुन काही फायदा होणार नाही.”

पुढे बोलताना नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, “या हल्ल्याचा कर्तारपूरशी काय संबंध ? यामुळे लोक, ह्रदय जोडले जात आहे. जेव्हा एखादी व्यक्ती भक्तीचा मार्ग स्विकारते तेव्हा त्याच्यात बदल होतात. आपण समस्येचं मूळ कारण शोधून त्यावर उपाय काढला पाहिजे.”

निवृत्त मेजर जनरल जी डी बक्षी यांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या या विधानावर जोरदार टीका केली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांचं वक्तव्य लाजिरवाणं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सिद्धू यांनी याआधीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीला हजेरी लावत वाद ओढवून घेतला होता.

दरम्यान राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना वेगळं मत मांडलं आहे. हा दुखाचा क्षण आहे. आम्ही भारतीय सरकार आणि सुरक्षा दलांना पूर्ण समर्थन देत आहोत. याशिवाय आम्ही कोणत्याही चर्चेत सहभागी होणार नाही असे राहुल गांधी म्हणाले होते. सर्व विरोधक सरकार आणि जवानांसोबत असल्याचंही ते म्हणाले आहेत. मात्र नवज्योत सिंग सिद्धू यांच्या तोंडी वेगळी भाषा दिसत आहे.