जमिन व्यवहारामध्ये सहभागी झाल्याचे दिसुन आल्याने ‘गनमॅन’ सह 2 पोलिस निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जमिन व्यवहारामध्ये सहभागी झाल्याने दिसुन आल्याने शहर पोलिस दलातील ‘गनमॅन’ सह 2 पोलिस कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहे. त्यांच्याबाबत तक्रारअर्ज प्राप्‍त झाला होता. तक्रारअर्जाच्या तपासाअंती त्यांना सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्‍त (आस्थापना) साहेबराव पाटील यांनी केली आहे.

‘गनमॅन’ शैलेश हरिभाऊ जगताप (पोलिस हवालदार, लष्कर पोलिस स्टेशन) आणि परवेझ शब्बीर जमादार (पोलिस नाईक, दरोडा प्रतिबंधक विभाग, गुन्हे शाखा) असे निलंबीत करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबाबत निलमणी धैर्यशिल देसाई यांनी पोलिस आयुक्‍त कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. त्यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी झाली. त्यामध्ये जगताप आणि जमादार यांचा देसाई यांच्या जमिनीच्या व्यवहारात सहभाग असल्याचे दिसुन आले आहे. पोलिस दलात राहुन पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दोन पोलिस कर्मचारी निलंबीत झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत आम्ही शैलेश जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, माझा भाऊ जितेंद्र हरिभाऊ जगताप यांनी दि. 2 जून रोजी हडपसर रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याला आत्महत्या करण्यास काही लोकांनी भाग पाडले असल्याचे त्याने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरून स्पष्ट झालेले आहे. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्‍त केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी काही जणांना अटक देखील केली आहे. सध्या ते तुरूंगात आहेत. मला कोठेतरी अडचणीत आणावे म्हणून माझ्या पोलिस खात्याबाहेरील विरोधकांनी किंबहुना माझ्या भावाच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्यांनी कोणालातरी पुढे करून माझ्याबद्दल तसेच माझा पोलिस दलातील मित्र परवेझ जमादार याच्याविरूध्द तक्रार करायला लावली. त्या तक्रारीला वेगळाच रंग देण्यात आला आहे. शेवटी तक्रार अर्जाच्या तपासाअंती वरिष्ठांनी माझ्यावर आणि जमादारवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. मात्र, मी कुठल्याही जमिन व्यवहारात सहभागी नाही. केवळ मला कोणाच्यातरी सांगण्यावरून गुंतवले जात आहे. महत्वाची बाब म्हणजे समर्थ पोलिसांनी जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात ज्यांच्याविरूध्द मोक्‍का अंतर्गत कारवाई केली आहे त्या गुन्हयात मी (शैलेश हरिभाऊ जगताप. बक्‍कल नं. 1834. नेमणुक सध्या ः- लष्कर पोलिस स्टेशन) आणि माझा पोलिस दलातील मित्र परवेझ जमादार (बक्‍कल नं. 3951. सध्या नेमणुक ः- गुन्हे शाखा. दरोडा प्रतिबंधक पथक) हे महत्वाचे साक्षीदार आहोत. मला एवढेच सांगायचे आहे की, मी कोणत्याही जमिन व्यवहारात सहभागी नाही असे सांगितले.