पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकरा लाखांचे सोने पकडले 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – वेगवेगळ्या पद्धतीने दुबईहून लपवून आणलेले सोने सीमा शुक्ल विभागाच्या पथकाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज (गुरुवारी) पकडले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ११ लाख ७ हजार रुपये किंमतीचे ३४९.९३ ग्रॅम सोने जप्त केले आहे. शेख तारीक महमुद असे प्रवाशाचे नाव आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुबईहून स्पाईसजेटचे एसजी 52 विमान उतरले. त्यावेळी या विमानातून आलेला प्रवाशी शेख तारीक महमुद याची तपासणी केल्यावर सीमा शुल्क विभागाच्या पथकाला त्याच्याजवळ सोने असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याची झडती घेतल्यावर दोन सोन्याचे बिस्कीट चार भागात तुकडे करून जीन्स पॅन्टला कमरेला लावून आणलेले तर दोन सोन्याचे सिक्के हुबेहुब चलनी सिक्क्यांप्रमाणे बनवलेले त्याच्या पाकीटात आढळून आले. तर र्‍होडीयम प्लेटींग केलेली एक सोन्याचीच किचेन रिंग असे एकूण 11 लाख 07 हजार 878 रुपये किंमतीचे 349.93 ग्रॅम सोने त्याच्याजवळ आढळून आले.

सीमा शुल्क विभागाने त्याच्याकडून सोने जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे. अशी माहिती सीमा शुल्क विभागाचे उपायुक्त हर्षल मेटे यांनी दिली.