घरफोडया करणार्‍या नेपाळी टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वॉचमन बनुन घरमालकांचा विश्‍वास संपादन करून घरमालक हे सुट्टीवर गेल्यानंतर इतर साथीदारांना बोलावुन लाखो रूपयांचा ऐवज चोरणार्‍या नेपाळी टोळीतील दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 18 लाख 96 हजार 139 चा ऐवज जप्‍त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे आणि सहाय्यक आयुक्‍त समीर शेख यांनी दिली.

केसर प्रेम साही (23, सध्या रा. कुंदन इस्टेट, सर्व्हे नं. 2 अ/2, शिवाजी गार्डन समोर, भाऊ पाटील रोड, बोपाडी. मुळ रा. जि. कालीकोट, नेपाळ) आणि च्चुमन उर्फ कृष्णा ब्रिकबहादूर साही (35, रा. वार्ड नं. 5, रामा रोशन ठाणा, सानताडा, जि. अच्छाम , नेपाळ) असी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे साथीदार मुकेश, त्याची पत्नी, मुकेशचा मित्र तपेंद्र आणि त्याचा भाऊ फरार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी आशिष भवरलाल जैन (39, रा. शिवाजी गार्डन समोर, भाऊ पाटील रोड, बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 10 नोव्हेंबर रोजी जैन आणि त्यांचे कुटूंबिय देव दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी जैन यांच्याकडे वॉचमन म्हणून काम करणार्‍याने त्याच्या इतर साथीदारांना बोलावुन घेतले आणि त्यांच्या घरातील रोख रक्‍कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 34 लाख 50 रूपयाचे दागिने चोरून नेले. खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकरणाचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत होती. पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम्, सह आयुक्‍त शिवाजी बोडखे आणि अप्पर आयुक्‍त (गुन्हे) प्रदीप देशपांडे यांनी घरफोडीचा तात्काळ छडा लावण्याचा आदेश दिला. त्यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे आणि सहाय्यक आयुक्‍त समीर शेख यांनी जैन यांच्या घरी वॉचमन म्हणून कामास असलेल्या नोकराची आणि यापुर्वी कोण-कोण कामास असलेल्यांची माहिती घेतली. वॉचमन म्हणून काम करणारे हे नेपाळ येथील असल्याने ते मथुरा, रतलाम, दिल्‍ली, गोरखपूर, भरतपुर रेल्वे मार्गे पळुन जाण्याची दाट शक्यता होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुंबई, ठाणे, भाईंदर आणि राज्यातील इतर ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नेपाळी वॉचमन आणि इतरांना संशयितांचे फोटो दाखवुन माहिती घेतली.

वेगवेगळया ठिकाणावरून मिळालेल्या आणि तांत्रिक विलेश्षणाच्या आधारे पोलिस पथकाला आरोपींचा ठावठिकाणा माहित झाला. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्‍त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, गुंडा स्कॉडचे अंजुम बागवान, युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे, निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक निरीक्षक संदीप देशमाने, उपनिरीक्षक अजय म्हेत्रे, अमोल भोसले, मदन कांबळे, सहाय्यक उपनिरीक्षक अरविंद चव्हाण, कर्मचारी अस्लम अत्‍तार, संतोष जाधव, मुथय्या, अनिल घाडगे, अतुल साठे, संदीप राठोड, सुजित पवार, माने, सागर तोरडमल यांच्या पथकाने आरोपी केसर आणि च्चुमन यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 लाख 71 हजार 30 रूपये रोख आणि 12 लाख 25 हजार 100 रूपये किंमतीचे सोन्याचे दगिने असा एकुण 18 लाख 96 हजार 139 रूपयाचा मुद्देमाल जप्‍त केला आहे. गुन्हयाचा पुढील तपास खडकी पोलिस करीत आहेत. फरार झालेल्या आरोपींचा गुन्हे शाखेचे पोलिस शोध घेत आहेत.

पोलिसांनी केले नागरिकांना आवाहन : – नागरिकांनी त्यांच्या घरात काम करणार्‍या नोकरवर्ग तसेच वॉचमनची पुर्ण माहिती घ्यावी. नोकरांची आणि वॉचमनचे जवळील पोलिस ठाण्यातुन चारित्र्य पडताळणी करून घ्यावी.