आरारा… ‘मुळशी पॅटर्न’ मुळे गणेश मारणेसह 10 जण गोत्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी काही दिवसातच ‘मुळशी पॅटर्न’ नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेला मुळशी परिसरातील काही सराईत गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे. त्याच पार्श्‍वभुमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संदीप मोहोळ खून प्रकरणातील आरोपी आणि कुख्यात गुंड गणेश मारणे आणि त्याच्या 10 साथीदारांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रांनी दिली आहे. पोलिस पथकाने मारणे आणि त्याच्या 10 साथीदारांना शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेरून ताब्यात घेतले आहे.

चित्रपटातील काही डायलॉग हे आमच्याशी संबंधित असल्याची तक्रार एका महिलेने पोलिसांकडे केली होती. मात्र, चित्रपट बनविणार्‍यांकडून तसा काही प्रकार नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासुन मुळशी आणि परिसरातील गुन्हेगार अधिक सक्रिय झाल्याची माहिती गुन्हे शाखेतील सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्याकडील अधिकार्‍यांना मिळाली होती. त्याच पार्श्‍वभुमीवर गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे, गुंडा स्कॉडचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान, वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक दिपक लगड, पथकातील सुनिल पवार, संभाजी गायकवाड, शंकर संपत्‍ते, विशाल शिर्के आणि सागर घोरपडे यांनी संदीप मोहोळ खून प्रकरणातील आरोपी गणेश मारणे, अनिल खिलारे, इंद्रनील मिश्रा, रहिम शेख, संतोष लांडे, शरद विटकर, संजय कानगुडे, विजय कानगुडे, निलेश माझिरे आणि दत्‍ता काळभोर यांना ताब्यात घेतले आहे. मुळशी परिसरातील इतर सराईत गुन्हेगारांची देखील चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.