१६ पोलिसांकडून CRPF च्या जवानाला बेदम मारहाण

बारामती (पुणे) : पोलीसनामा ऑनलाईन  – जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा घटनेनंतर सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच बारामतीत एका सीआरपीएफ जवानाला बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या अधिकारी आणि पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. हा जवान पुलवामा भागातच कार्यरत असून सध्या सुट्टीवर गावी आला आहे. हा जवान श्रद्धांजली सभेची परवानगी मागण्यासाठी दुचाकीवर ट्रिपल सीट आल्याने त्याला मारहाण करण्यात आली. अशोक इंगवले असे मारहाण झालेल्या सीआरपीएफ जवानाचे नाव आहे.

अशोक इंगवले हा जवान सोनगाव येथील राहणारा आहे. आज (रविवार) सकाळी श्रद्धांजली सभेसाठी परवानगी मागण्यासाठी तालुका पोलीस ठाण्यात गेला होता. दुचाकीवरुन ट्रिपल सीट आल्याचा व दारु पिल्याचा आरोप करीत तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. तसेच १६ पोलिसांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली.

 

आपण दारु पिलो नसल्याचे अशोक इंगवले याने सांगितले. माझी वैद्यकीय तपासणी करा. यामध्ये सत्य बाहेर येईल असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी त्याचे ऐकून न घेता पोलीस ठाण्यात ठांबून ठेवत बेदम मारहाण केली.

दरम्यान, या घटनेची माहिती युवकांना आणि नागरिकांना समजताच त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली. यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ जवानांवर हल्ल्याचा निषेध संपूर्ण देशात होत आहे. असे असतानाच हा प्रकार समोर आल्याने पोलिसांच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकारा बाबतचे सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई करु असे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी यावेळी संतप्त जमावाला सांगितले.