खरीप हंगामातील बाधित शेतकऱ्यांसाठी 206.59 कोटी निधी उपलब्ध

पुणे :पोलीसनामा ऑनलाइन – सन 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित पुणे विभागातील शेतकऱ्यांना पहिला हप्ता वाटप करण्यासाठी 206.59 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक 25 जानेवारी 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना दोन किंवा तीन हप्त्यात मदत वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून 6 हजार 800 रुपये प्रति हेक्टर या दराच्या 50 टक्के म्हणजेच 3 हजार 400 रूपये प्रति हेक्टर किंवा किमान एक हजार रुपये यापैकी अधिक असेल ती रक्कम शेती पिकांचे बाधित झालेल्या सर्व शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप सुरु करण्यात आले आहे.

ही मदत 2 हेक्टरच्या मर्यादेत व लागवड केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेपर्यंतच राहील. मदतीची रक्कम संबंधितांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम खातेदाराच्या बँक खात्यावर थेट जमा करताना मदतीच्या रकमेमधून कोणतीही बँक कोणत्याही प्रकारची वसूली करणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

ही रक्कम वाटप करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी त्यांना प्रदान केलेल्या माहितीसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. 2018 च्या खरीप हंगामातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक व बँक खात्याशी संबंधीत सविस्तर माहिती शासनास सादर करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर यांनी केले आहे.

पुणे विभागासाठी पहिला हप्ता वाटप करण्यासाठी जिल्हानिहाय निधी पुढील प्रमाणे आहे. एकुण मदतीची रक्कम रुपये कोटीमध्ये आहे. पुणे- 53.239808, सातारा- 21.36064, सांगली – 34.4064, सोलापूर- 97.593096 असा एकुण 206.599944 इतक्या रकमेचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
00000