हडपसर पोलिसांकडून सराईत चोरटयाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरी करणार्‍या सराईताला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले असुन पोलिसांनी 8 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे. उघडकीस आलेल्या गुन्हयांमध्ये जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्हयाचा समावेश आहे.

मोहसीन लाला खान (30, रा. लोणी काळभोर, पठारे वस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक भांगे आणि पोलिस कर्मचारी नितीन मुंढे यांना आरोपीबाबत माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यात आली.

अप्पर आयुक्‍त सुनिल फुलारी, पोलिस उपायुक्‍त प्रकाश गायकवाड, सहाय्यक आयुक्‍त सुनिल देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल तांबे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश भांगे, कर्मचारी प्रताप गायकवाड, विनोद शिवले, धायगुडे, नितीन मुंढे, अकबर शेख आणि शशिकांत नाळे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने हडपसर, विमानतळ, लोणंद आणि शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी आणि वाहन चोरीचे एकुण 10 गुन्हे केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 5 दुचाकी, एक चारचाकी, सोन्याचे दागिने आणि रोख रक्‍कम असा एकुण 8 लाख 50 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे. अटक केल्यानंतर आरोपी मोहसीन खान याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला आज (गुरूवार) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.