पुण्याच्या खासदाराने घेतली अजित पवारांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस कडून पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचे काम करू असा शब्द पवार यांनी दिला. तर पत्रकारांशी बोलताना काकडे यांनी स्थानिक भाजपमधील काही सोंगाड्यांमुळे माझी ही अवस्था झाली आहे असे स्पष्ट केले.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघात खासदार काकडे हे काँग्रेस कडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून बाहेरील उमेदवार नको अशी भूमिका घेत त्यांना विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार काकडे यांनी अजित पवार यांची भेट घेऊन उमेदवारी संदर्भात एक महत्त्वपूर्ण खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप उमेदवार कोण असेल ही चर्चा रंगू लागली आहे. खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार प्रदीप रावत, आमदार जगदीश मुळीक, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले आदींची नावे चर्चेत आहेत. भाजपमध्ये उमेदवारी मिळू शकत नाही हे यापूर्वीच काकडे यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस कडून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सहकार्य मिळेल का ? याची चाचपणी देखील त्यांनी अजित पवार यांची भेट घेऊन केल्याचे स्पष्ट झाले. या भेटीबाबत पवार म्हणाले, “कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा लवकर सुटेल. पुणे जिल्ह्यात असलेल्या साडेतीन लोकसभा मतदारसंघांपैकी तीन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असतो. त्यामुळे पुणे शहर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस कडे असावा अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा कोणाला मिळेल लवकरच ठरेल. काँग्रेसने उमेदवारी कोणाला द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. ज्याला उमेदवारी देतील त्या उमेदवाराचे काम राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करतील. भाजपच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या विधानांविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली.”

पत्रकारांशी बोलताना खासदार काकडे म्हणाले, “माझे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चांगले संबंध आहेत. परंतु भाजपच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे आज ही स्थिती निर्माण झालेली आहे. मी किंवा मला मानणारे नगरसेवक आमदार यांना भाजपने कोणतेच पद दिले नाही. भाजपने केवळ माझा वापरच केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच आणि माझे भावाचं आता आहे. एका भावाने लाथाडल्यानंतर तो दुसऱ्या ठिकाणी आश्रय घेणारच ना “.