पुण्यात 2 गटात तुफान राडा : सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन- दत्‍तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जनता वसाहतीमध्ये दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली असुन त्यामध्ये एका सराईत गुन्हेगाराचा कोयत्याने सपासप वार करून खून झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच दत्‍तवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेमध्ये इतर अन्य दाेघे जण जखमी झाले आहेत.

निलेश उर्फ निल्या वाडकर असे खून झालेल्याचे़ नाव आहे. निलेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून येरवडा कारागृहासमोर झालेल्या गोळीबार प्रकरणात तो आरोपी होता. काही दिवसांपुर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता. आज (रविवारी) सायंकाळी दोन गटात कोणत्यातरी कारणामुळे वाद झाला.वादाचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यामध्ये एका चॉकलेट सुन्याच्या गटातील निलेश वाडकरवर कोयत्याने सपासप वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, दत्‍तवाडी आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासुन परिसरातील गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. दोन गटामध्ये वेळावेळी होणार्‍या वादामुळेच निलेश वाडकरचा खून झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. पुन्हा एकदा दत्‍तवाडी आणि जनता वसाहतीमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम चालु असल्याची माहिती देण्यात आली आहे.

निलेश वाडकर आणि चॉकलेट सुन्या यांच्यामध्ये गेल्या एक महिन्यापासुन वाद चालु होते. शनिवारी निलेश वाडकर हा चॉकलेट सुन्याच्या घरात घुसला होता. मात्र, तो तेथे मिळुन आला नाही. निलेश वाडकर, चॉकलेट सुन्या आणि सनी चव्हाण या तिघांचे जनता वसाहतीमध्ये गट आहेत. सनी चव्हाण आणि चॉकलेट सुन्या यांच्यामध्ये समझोता जवळपास झाला होता. तो निलेश वाडकरला मान्य नव्हता. त्यामुळे सुन्या आणि निलेश यांच्यामधील वाद वाढले होते. त्यामधुनच चॉकलेट सुन्या आणि त्याचा साथीदार योगेश जामले आणि इतरांनी मिळुन निलेशचा कोयत्याने सपासप वार करून खून केला आहे. दरम्यान, चॉकलेट सुन्या आणि योगेश जामले हे दोघेही तडीपार आहेत. दोन गटामधील हाणामारीमध्ये इतर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती अतिशय गंभीर असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.