विद्यापीठातील इंग्रजी विभागाचा कार्यभार डाॅ.संजीव सोनवणे यांच्याकडे

पुणे: पोलीसनामा आॅनलाइन
इंग्रजी विभागातील विद्यार्थ्यांच्या उपोषणाला यश आले असून, अखेर आज विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या विभागप्रमुख हटाव या मुख्य मागणीसह अन्य मागण्या मान्य केल्या आहेत. कुलगुरुंनी इंग्रजी विभागाचा कार्यभार शिक्षणशास्त्र व शिक्षणविस्तार विभागाचे विभागप्रमुख डाॅ. संजीव सोनवणे यांच्याकडे सुपुर्त केला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चार दिवसांपासून इंग्रजी विभागातील तब्बल १७ मुले आणि १३ मुली यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरु आहे. या चार दिवसांत विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. यापैकी काही विद्यार्थ्यांना ससून तसेच औंध ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या नंतरही विद्यार्थ्यांनी माघार न घेता त्यांच्या मागण्यांवर ठाम राहिले. विद्यापीठ प्रशासनाने अखेर आज त्यांची दखल घेत मागण्या मान्य केल्या आहेत.

या उपोषणाच्या चार दिवसांमध्ये विद्यापीठाचे सिनेट सदस्य अभिषेक बोके यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच विद्यापीठातील राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेस, एस.एफ.आय, ए.बी.व्ही.पी, एन.एस.यु.आय, डापसा, मराठवाडा विद्यार्थी समिती यांसह अनेक संघटनांनी उपोषणास पाठिंबा दर्शविला. विद्यापीठातील दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांनीही या उपोषणास पाठिंबा दर्शविला.

उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, विद्यार्थी लेखी आश्वासन मिळेपर्यंत उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. संध्याकाळी सहापर्यंत लेखी आश्वासन मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्या
1) इंग्रजी विभागप्रमुखांना पदमुक्त करावे.
2) विभागप्रमुखांचे पद प्रभारी अथवा इतर अधिष्ठात्यांकडे सोपवावे.
3) एम. ए. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 15 मे 2018 नंतर घ्यावी.
4) विभागात नियुक्त असलेल्या सहाय्यक प्राध्यापकांचा कार्यकाळ संपल्यावर तो वाढवू नये.
5) मुलांच्या शैक्षणिक नुकसानीचे व चौथ्या सत्राच्या गुणांचे पुर्नमुल्यांकन व्हावे. तिसऱ्या सत्रात झालेले नुकसान चौथ्या सत्रात भरून               काढण्यात यावे.
6) एलजीबीटी या विषयासाठी नियुक्त प्राध्यापक जमीर कांबळे यांची हकालपट्टी करून प्रा. राज राव यांची तात्काळ नियुक्ती करण्यात        यावी.
7) 15 मे नंतर घेण्यात येणाऱ्या परीक्षा सध्या नियुक्त असलेल्या प्राध्यापकांव्यतिरिक्त इतर प्राध्यापकांच्या देखरेखीखाली पार पाडण्यात        याव्यात.
8) विभागात यापुढे भेदभाव अथवा अन्याय होऊ नये, यासाठी उपाय करावे. तसेच ग्रामीण व शहरी अशी भेदाची वागणूक देऊ नये.