मोदी सरकारने ‘त्या’ प्रकरणात भ्रष्टाचार केला यात शंकाच नाही : राहुल गांधी

नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था – राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला यात शंकाच नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केला आहे. राफेल खरेदी करताना मोदी सरकारने निश्चित केलेली किंमत ही ‘संयुक्त राष्ट्रीय आघाडी’ सरकारच्या कराराच्या अधिनस्थ राहून दिलेली नाही. राफेल खरेदीसाठी जेवढे पैसे ‘संयुक्त राष्ट्रीय आघाडी’ सरकार मोजणार होते त्यापेक्षा जास्त पैसे विद्यमान केद्र सरकारने दिले आहेत असे मत भारतीय वाटाघाटी पथकातील (आयएनटी) तीन वरिष्ठ अधिकार्‍यांनी (संरक्षण मंत्रालयातील अधिकारी) नोंदविले आहे. असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. त्यामुळे राफेल खरेदीत भ्रष्टाचार झाला यात शंकाच नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
विद्यमान केंद्र सरकारने केलेली राफेल विमान खरेदी ही ‘संपुआ’ सरकारच्या काळात केलेल्या करारातील किमतीपेक्षा 2.86 टक्क्यांनी स्वस्त असल्याचा निष्कर्ष कॅगच्या अहवालात काढण्यात आला. संसदेत बुधवारी हा अहवाल सादर करण्यात आला. एका इंग्रजी दैनिकात यासंबंधी वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्याचा हवाला देत राहुल गांधी यांनी कॅगच्या निष्कर्षावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ‘कॅग’चा दावा खोडून काढण्यासाठी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना भारतीय वाटाघाटी पथकातील संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या निरीक्षणाचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, “‘संपुआ’ सरकारच्या कार्यकाळात राफेल विमान खरेदी करारात एव्हिएशनसाठी विहित केलेल्या अटी-शर्तींनुसार मोदी सरकारने विमानांची किंमत निश्‍चित केली नाही; तर त्यापेक्षा जास्त किंमत मोदी सरकारने दिलेली आहे. वाटाघाटी चमूतील सात सदस्यांंपैकी तीन वरिष्ठ सदस्यांनी तसे मत नोंदविले आहे. या नोटमधून हे सिद्ध होते की, नरेंद्र मोदी यांनी अनिल अंबानी यांच्या खिशात 30 हजार कोटी रुपये टाकले.”