राहुल गांधी हे परदेशी कंपन्यांचे लॉबिस्ट : भाजपचा पलटवार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राफेच्या मुद्द्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा अक्षरश: पिच्छा पुरवला आहे. माेदी सरकारवर राहुल यांनी आरोपांचा पाऊस पाडला आहे. राफेल कराराला घेऊन त्यांनी मोठा खुलासा केला होता. राहुल गांधी यांनी एअरबस कंपनीचा ई-मेल सादर करून अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी १० दिवसांत राफेल व्यवहारावर स्वाक्षरी होईल, असा खुलासा केला होता. यानंतर आता राहुल गांधी यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत असे सांगत केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. इतकेच नाही तर, राफेल प्रकरणी राहुल यांच्याकडून नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप लज्जास्पद आणि बेजबाबदारपणाचे आहेत, असे रवी शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. शिवाय राहुल यांच्यावर गंभीर आरोपही केला.

राहुल गांधी यांच्यावर पलटवार करताना रवी शंकर प्रसाद म्हणाले की, “राहुल गांधी हे विमाने पुरविणाऱ्या कंपन्यांचे लॉबिस्ट म्हणून काम पहात आहेत. त्यांना एअरबसचा ई-मेल कुठे मिळाला ? राहुल गांधी यांनी एअरबस कंपनीचा जो ई-मेल सादर केला; तो राफेल संबंधित नसून अन्य कोणत्या तरी हेलिकॉप्टर व्यवहाराशी संबंधित आहे” असा दावा त्यांनी केला आहे.

इतकेच नाही तर, “एअरबस या कंपनीबरोबर काँग्रेस सरकारच्या काळात झालेले व्यवहार संशयास्पद आहेत. आम्ही राहुल गांधी यांचा खोटेपणा जनतेसमोर आणू” असा इशारा रवी शंकर प्रसाद यांनी दिला.

राहुल गांधी यांनी आज राफेल प्रकरणाला घेऊन एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक नवा ई-मेल सादर केला आहे. या ई-मेल मध्ये एअरबस कंपनीचे वरिष्ठ अधिकारी लिहितात की, ‘अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना भेटले आहेत आणि त्यांनी १० दिवसात राफेल व्यवहारावर स्वाक्षरी होईल, असे सांगितले आहे.’

ई-मेलच्या खुलाशानंतर या ई-मेलवरुन जी माहिती समोर आली आहे त्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दोषी मानत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.