राष्ट्रवादीच्या नकारानंतर ‘कृष्णकुंज’वर खलबते

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मनसेला बरोबर घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेत एकच खळबळ उडाली असून मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकला चलो रे ची भूमिका घ्यावी लागणार आहे. याबाबत रणनिती ठरविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर बैठक बोलावली आहे.

राज ठाकरे काही प्रश्नावर आमच्या सोबत असले तरी निवडणुकीत एकत्र नसतील, असं सांगत मनसे-राष्ट्रवादी यांची आघाडी होण्याच्या चर्चांवर खुद्द शरद पवारांनी पडदा टाकला होता.

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचे शरद पवारांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीशी साधलेली जवळीक फुकट गेली की काय, असा मनसेसमोर प्रश्न आहे. महागठबंधनमध्ये स्थान मिळालं नाही तर करायचे काय यावर मनसेची खलबते सुरु आहेत.

लोकसभा निवडणुकीत मनसे मुंबई आणि ठाण्यासह तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहे. महागठबंधनमध्ये मनसेला स्थान मिळाले नाही, तरी मनसे लढवत असलेल्या तीन जागांवर आघाडीचा उमेदवार दिला जाऊ नये, असा प्रस्ताव ठेवण्याबाबत मनसेच्या गोटात चर्चा सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका ठेवायची हे या बैठकीत ठरण्याची शक्यता असल्याने राज्यातील सर्व मनसे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने ही बैठक महत्वाची असणार आहे.